Sanjay Raut: मिंधे सरकार लवकर घालवलं नाही, तर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील; संजय राऊत यांचा आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 10:59 AM2022-11-23T10:59:52+5:302022-11-23T11:00:35+5:30

कर्नाटककडून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला जात असल्याचं वृत्त समोर येताच खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut says Dismiss the shinde government soon or else Maharashtra will be divided into five parts | Sanjay Raut: मिंधे सरकार लवकर घालवलं नाही, तर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील; संजय राऊत यांचा आरोप!

Sanjay Raut: मिंधे सरकार लवकर घालवलं नाही, तर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील; संजय राऊत यांचा आरोप!

googlenewsNext

मुंबई- 

कर्नाटककडून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला जात असल्याचं वृत्त समोर येताच खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातलं 'मिंधे सरकार' लवकरात लवकर घालवलं पाहिजे, नाहीतर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

बेळगाव सीमाप्रश्नावरुन नुकतीच राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. असं असतानाही आता कर्नाटकच्या मंत्र्यांकडून जी भाषा बोलली जात आहे ती पाहता हे सरकार महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालं आहे असं दिसतं, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. "राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजवर सीमाबांधवांच्या कोणत्या प्रश्नांना वाचा फोडली आहे? आता तर सांगलीत जत तालुक्यावर कर्नाटकनं दावा केला आहे. कर्नाटकातही भाजपाचा मुख्यमंत्री आहे आणि इथं भाजपाचं मिंधे सरकार आहे. दोघांच्या संगनमतानं केंद्र सरकारला महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत. कुणाला मुंबई तोडायची आहे तर कुणाकडून महाराष्ट्राला कुरतडण्याचं काम केलं जात आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

उद्या आसामचे मुख्यमंत्रीही महाराष्ट्रावर दावा करतील
"राज्यात सीमाप्रश्न महत्वाचा असताना आणि कर्नाटककडून महाराष्ट्रातील गावांवर दावा केला जातोय. पण राज्याचे मुख्यमंत्री ४० आमदारांसह गुवाहटीला निघालेत. आता उद्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील जिल्ह्यावर दावा केला नाही म्हणजे मिळवलं. राज्यातलं हे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही, तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केंद्र सरकार करेल", असं संजय राऊत म्हणाले. 

आदित्य ठाकरेंचा राष्ट्रीय दौरा
आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर असून ते तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. "आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे बिहारचा दौरा म्हणून न पाहता राष्ट्रीय दौरा म्हणून पाहायला हवं. आदित्य ठाकरे तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. दोघंही तरुण नेते आहेत. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या सहाय्यानं राजकीय परिवर्तन घडवलं आहे. त्यामुळे अशा तरुण नेत्यांनी भेटणं फार गरजेचं आहे. देशातील अनेक तरुण नेत्यांना आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधायचा आहे", असं संजय राऊत म्हणाले.

Read in English

Web Title: Sanjay Raut says Dismiss the shinde government soon or else Maharashtra will be divided into five parts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.