मुंबई-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत आयोजित पक्षाच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे, आवाज काढणं खूप झालं. आता मॅच्युर व्हा आणि संघटनात्मक काम करा, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
राज ठाकरे यांनी कालच्या सभेत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मिमिक्री केली होती. याच मुद्द्यावर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. "राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे, आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हर यांची ओरिजनल मिमिक्री पाहू. राजकारणात आता अजून किती दिवस आवाज काढत बसणार? आता तरी मॅच्युर व्हा आणि प्रगल्भ राजकारण करा. आवाज काढणं आता खूप झालं. याच्या पलिकडे पाहायला हवं, संपूर्ण महाराष्ट्र पाहा. उद्धव ठाकरेंवर टिका करुन तुमचं राजकारण किती दिवस चालणार? जरा विधायक आणि संघटनात्मक काम करा. आता आमच्यावर इतकी संकटं आलेली आहेत तरी आम्ही लढतो आहोत. काम करतो आहेत. जे टिका करताहेत त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी", असं संजय राऊत म्हणाले.
भाजपाचे टगे आता शहाणपणा शिकवत आहेतभाजपाचे टगे आता महापुरूषांचा अपमान करुन महाराष्ट्राला शहाणपणा शिकवत आहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावं की महाराष्ट्र बघतो आहे. त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. महापुरूषांचा अपमान होत असताना भाजपा आणि शिंदे गट हात चोळत बसला आहे. देशातील कोणत्याही महान नेत्याचा अपमान होऊ नये अशी आमची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. त्यांच्यावर चिखलफेक करुन राजकारण कसलं करताय? सावरकरांबाबत इतकंच प्रेम उफाळून येत असेल तर भारतरत्न द्या की आम्हीही साथ देऊ, असं संजय राऊत म्हणाले.