Join us

Sanjay Raut: "सरकार लवकरच दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, सुत्रधार कळेल"; संजय राऊतांचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 11:14 AM

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत तब्बल सव्वाशे तासांचे केलेले स्टिंग ऑपरेशन २९ वेगवेगळ्या पेनड्राइव्हमध्ये भरुन सादर केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई-

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत तब्बल सव्वाशे तासांचे केलेले स्टिंग ऑपरेशन २९ वेगवेगळ्या पेनड्राइव्हमध्ये भरुन सादर केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणावर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "आरोप करणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं. एखाद्या नेत्याविरोधात असं खोटं षडयंत्र रचणं अशी शिकवण महाराष्ट्रातील पोलिसांना नाही. तशी शिकवण घ्यायला केंद्रीय यंत्रणांकडून धडे घ्यावे लागतील. उगाच सनसनाटी निर्माण करुन महाराष्ट्राच्या पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

"सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि वृत्तपत्रात जागा मिळवण्यासाठी विरोधक असं आरोप करत असतात. फडणवीसांनी काल केलेले आरोप मी पाहिले. गिरीश महाजनांविरोधात खोटं प्रकरण उभं केलं गेल्याचं ते म्हणाले. पण या संपूर्ण नाट्याचं नेपथ्य कोण करत आहे? कथा कुणाची आहे? सुत्रधार कोण आहे हे समोर आल्याशिवाय राहणार नाही. सरकार लवकरच दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल", असा सूचक इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे. 

महाराष्ट्राच्या पोलिसांना बदनाम करण्याचं काम"गिरीश महाजनांविरोधात काहीतरी खोटं प्रकरण उभं केल्याचं सांगितलं जात आहे. पण महाराष्ट्राचे पोलीस असं करत नाहीत. त्यांना चांगलं प्रशिक्षण आहे. राज्याच्या पोलिसांना देशात यासाठी प्रतिष्ठा मिळाली कारण ते राजकीय दबावाखाली काम करत नाहीत. त्यांना जर असे खोटे पुरावे आणि षडयंत्र रचायचं असेल तर आम्हाला त्यांना ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडे धडे घ्यायला पाठवावं लागेल. राजकीय नेत्यांना कसं अडकवायचं, खोटे पुरावे कसे उभे करायचे हे काम केंद्रीय यंत्रणांकडून सुरू आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनादेवेंद्र फडणवीस