Sanjay Raut: मी सेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही करणार का?; राऊतांचा शिंदे गटाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:27 AM2022-06-30T10:27:05+5:302022-06-30T10:30:22+5:30

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याला संजय राऊत कारणीभूत असल्याची टीका केली गेली. यावर आज सकाळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Sanjay Raut says I made Chief Minister of shivsena will you Raut question to Shinde group | Sanjay Raut: मी सेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही करणार का?; राऊतांचा शिंदे गटाला सवाल

Sanjay Raut: मी सेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही करणार का?; राऊतांचा शिंदे गटाला सवाल

Next

मुंबई-

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याला संजय राऊत कारणीभूत असल्याची टीका केली गेली. यावर आज सकाळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन असा शब्द बाळासाहेबांना दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला. पण जे आज आमच्याविरोधात बोलत आहेत. ते तिथं जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवणार आहेत का?", असं संजय राऊत म्हणाले.  

"स्वाभिमानाची मीठ भाकरी गहाण ठेवून तिकडे तुम्हाला चाकरीच करायची आहे. तिथं धुणीभांडीच करणार आहात ना? ज्यांना सरकार पाडण्याचं कंत्राट मिळालं होतं त्यांनी ते करुन दाखवलं. त्याबद्दल त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ठाकरे कुटुंबाला कधीच सत्तेची लालसा नव्हती. शरद पवारांनी विनंती केली म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. पण आपल्याच लोकांनी दगा केला. आता याबाबत फार काही बोलत बसण्यात अर्थ नाही. आम्ही आता उत्तम विरोधी पक्ष म्हणून काम करू आणि शिवसेना पुन्हा एकदा गगनभरारीर घेईल", असं संजय राऊत म्हणाले. 

...त्यांचं पवारांनीच पालनपोषण केलं
जे आज बंडाची भाषा करत आहेत आणि शरद पवारांना दोष देत आहेत. त्यांचं राजकीय पालनपोषण शरद पवार यांच्याच नेतृत्त्वात झालेलं आहे, असा टोला संजय राऊत यांनी दीपक केसरकर आणि इतर बंडखोर नेत्यांना लगावला. "महाविकास आघाडी सरकारविरोधात आज जे गळा काढत आहेत. ते गेली अडीच वर्ष सत्तेत होते. उत्तम खाती हातात होती", असंही राऊत म्हणाले. 

ईडीच्या चौकशीला जाणार
संजय राऊत यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलेलं आहे. ईडीच्या चौकशीला उद्या दुपारी जाणार असल्याचंही राऊत यांनी यावेळी सांगितलं. "मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. कितीही झालं तरी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. हार मानणं माझ्या रक्तात नाही. ईडीच्या चौकशीला उद्या दुपारी मी हजर राहणार आहे. कायद्यावर विश्वास ठेवण्याचे संस्कार आमच्यावर आहेत", असं संजय राऊत म्हणाले.

Read in English

Web Title: Sanjay Raut says I made Chief Minister of shivsena will you Raut question to Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.