'मुख्यमंत्री ठाकरेंचा संशय खरा ठरला...', आर्यन खान प्रकरणी संजय राऊतांचं मोठं विधान; थेट Video समोर आणला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 04:03 PM2021-10-24T16:03:15+5:302021-10-24T16:03:54+5:30

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी क्रूझवरील छापेमारीवेळी जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर साक्षीदार म्हणून सह्या घेण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील साक्षीदारानं केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालं आहे.

Sanjay raut says iitnes in Aryan Khan case made to sign on blank paper by NCB is shocking | 'मुख्यमंत्री ठाकरेंचा संशय खरा ठरला...', आर्यन खान प्रकरणी संजय राऊतांचं मोठं विधान; थेट Video समोर आणला

'मुख्यमंत्री ठाकरेंचा संशय खरा ठरला...', आर्यन खान प्रकरणी संजय राऊतांचं मोठं विधान; थेट Video समोर आणला

googlenewsNext

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी क्रूझवरील छापेमारीवेळी जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर साक्षीदार म्हणून सह्या घेण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील साक्षीदारानं केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालं आहे. साक्षीदाराच्या खळबळजनक आरोपांवरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आर्यन खानचा एक व्हिडिओ ट्विट करत नवा पुरावा समोर आणला आहे. तपास यंत्रणेकडून साक्षीदारांकडून जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर सही करुन घेण्याचा प्रकार धक्कादायक असून याप्रकरणात खंडणी मागितल्याचाही आरोप केला जात आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

"महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा संशय राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला होता. तो संशय आता खरा ठरताना दिसत आहे. आर्यन खान प्रकरणात साक्षीदाराला जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर सही करायला लावणं हे धक्कादायक आहे. यासोबतच मोठ्या रकमेची खंडणी म्हणून मागणी केल्याचीही माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य दखल घेऊन कारवाई करावी", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. यात राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही टॅग केलं आहे. तसंच किरण गोसावी त्याचा मोबाइल आर्यन खान याला देत असून तो आर्यनला फोनवर काहीतरी बोलायला सांगत असल्याचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. 

आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी याआधीपासूनच एनसीबीविरोधात मोठी आघाडी उघडली आहे. क्रूझवर टाकण्यात आलेला छापा बनावट आणि फेक असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. आर्यन खानला हाताला धरुन एनसीबीच्या कार्यालयात घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा आर्यनसोबतचा सेल्फी व्हायरल झाल्यानंतरही वाद निर्माण झाला होता. त्यावर एनसीबीनं संबंधित व्यक्ती एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. आर्यनला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन येणारा तो व्यक्ती नेमका कोण होता याची माहिती समोर आल्यानंतर त्याचं नाव किरण गोसावी असल्याचं निष्पन्न झालं होतं. किरण गोसावी एक खासगी गुप्तहेर असून त्याचं याप्रकरणात नाव समोर आल्यानंतर तो गायब झाला आहे. याच किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं एनसीबीच्या कारवाईबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी क्रूझवर केलेल्या छापेमारीवेळी आपल्याकडून जबरदस्तीनं कोऱ्या कागदांवर पंचनामा म्हणून साक्षीदाराच्या रुपात सह्या घेण्यात आल्या, असा दावा प्रभाकर साईल यानं केला आहे. आपल्याला अटक करण्यात आलेल्यांबाबत कोणतीही माहिती नव्हती, असंही तो म्हणाला आहे. क्रूजवरील छापेमारीचा तो साक्षीदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर हा किरण गोसावीचा(Kiran Gosavi) बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारीपूर्वी गोसावीला कोऱ्या कागदावर सही करण्यासाठी मजबूर केले. क्रुझवर ड्रग्ज मिळाले की नाही याबाबत कल्पना नाही. परंतु या कोऱ्या कागदाचा वापर आर्यन प्रकरणात वापरण्यात आला. किरण गोसावी कुणासोबत तरी फोनवर बोलत होता. ज्यात २५ कोटींचा बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख होता. ही डील १८ कोटींमध्ये सेटल होणार होती. ज्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते. या संवादात शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीकडून पैसे घेण्याचा उल्लेख होता. पूजा फोन उचलत नव्हती असंही संवादात म्हटलं गेले. तर मुंबई क्रुझवर धाड टाकण्यापूर्वी किरण गोसावीला NCB कार्यालयाबाहेर सॅम डिसुझा नावाचा व्यक्ती भेटला होता. छापेमारीवेळी सावधतेने काही व्हिडीओ आणि फोटो घेतले गेले. एका व्हिडीओत स्पष्टपणे दिसत होतं की, गोसावीने ताब्यात घेण्यापूर्वी आर्यन खान कुणाशी तरी फोनवरुन संवाद साधत होता. या कारवाईमागे मोठं षडयंत्र असल्याचा संशय प्रभाकर साईलनं व्यक्त केला आहे.

Web Title: Sanjay raut says iitnes in Aryan Khan case made to sign on blank paper by NCB is shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.