Join us  

Sanjay Raut: 'विषय संपला'... शरद पवारांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊतांनी विषय संपवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 6:38 PM

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका शिवसेनेच्या काही खासदारांनी मांडली होती.

मुंबई-

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका शिवसेनेच्या काही खासदारांनी मांडली होती. त्यानंतर आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महत्वाचं विधान केलं आहे. 

"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत नक्कीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू या उमेदवारांबद्दल बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेनं याआधीही पक्षीय अभिनिवेश बाजूला सारुन राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. बैठकीत खासदारांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यानंतर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार खासदारांनी पक्ष प्रमुखांना दिले आहेत. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल", असं संजय राऊत म्हणाले. 

'तो' विषय संपला!औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विषय सरकारच्या किमान समान कार्यक्रमात नव्हता तो ऐनवेळी निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया दिली. याबाबत विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी 'संपला विषय' इतकंच म्हटलं आणि अधिक बोलणं टाळलं. 

शरद पवार नेमकं काय म्हणाले?"औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता", असं शरद पवार म्हणाले होते.

 

टॅग्स :संजय राऊतशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस