संजय राऊत म्हणतात, देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे....
By महेश गलांडे | Published: October 16, 2020 11:50 AM2020-10-16T11:50:35+5:302020-10-16T12:16:09+5:30
राज्यात मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही जशास तसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले.
मुंबई - महाविका आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद अद्यापही नेत्यांच्या बोलण्यातून जाणवतो. खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या नियुक्तीवरुन पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला. देशातील दोनच राज्यात राज्यपाल नियुक्त आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्येच राज्यपाल आहेत, असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारला चिमटा काढला आहे.
राज्यात मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही जशास तसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले. यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. तसेच, राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरुन राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. त्यानंतर, पुन्हा एकदा राऊत यांनी मोदी सरकारला राज्यपालांच्या भूमिकेवरुन लक्ष्य केलंय.
#WATCH आजकल पूरे देश में दो ही (जगह) राज्यपाल हैं, पश्चिम बंगाल और महाराष्ट्र। बाकी कहां राज्यपाल है या नहीं मुझे पता नहीं: संजय राउत, शिवसेना pic.twitter.com/B4UhhoVE1w
— ANI_HindiNews (@AHindinews) October 16, 2020
देशात केवळ दोनच राज्यात राज्यपाल आहेत, एक महाराष्ट्रात आणि दुसरे पश्चिम बंगालमध्ये, असे राऊत यांनी म्हटले. राज्यपाल हे भारत सरकार आणि राष्ट्रपतींचे पॉलिटकल एंजट असतात, कारण ते राजकीय काम करतात. सध्या महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी सरकार आहे, म्हणून देशातील या दोनच राज्यात राज्यपाल असल्याचा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचं सरकार असून जगदीप धनखार हे येथील राज्यपाल आहेत. मात्र, येथेही राज्यपाल आणि राज्य सराकरमध्ये सातत्याने खटके उडताना दिसत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातही भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याचं पाहायला मिळतं.
कोश्यारींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याची सूचना केली. तसेच, आपण हिंदुंचे कट्टर पुरस्कर्ते आहात, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शनही घेतले. आषाढी एकादशीला पंढरीला जाऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजाही केली. मात्र, राज्यात मंदिरे खुली करण्याबाबतची आपली भूमिका पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. आपण, अचानक सेक्युलर तर झाले नाहीत ना? असा सवालही कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना जशास तसे उत्तर दिलंय.
मुख्यमंत्र्यांच राज्यपालांना प्रत्युत्तर
देशात अचानक लॉकडाऊन लादणे योग्य नव्हते. त्यामुळेच, एकदम ते पूर्णपणे रद्द करणेही उचित ठरणार नाही, असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीला एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तुर्तास नकार दर्शवला आहे. त्यासोबतच, राज्यपालांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता, त्यावरही मुख्यमंत्र्यांनी जशात तसे उत्तर दिलंय. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरेंचं उत्तर हे ऐतिहासिक ठेवा असेल, असे म्हणत राज्यपाल कोश्यारी हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.
हिंदुत्वाच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्याचें हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.