Sanjay Raut ( Marathi News ) :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टाने आज शिक्षा सुनावली आहे. राऊत यांना अब्रुनुकसानीच्या प्रकरणात १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय राऊतांना कोर्टाने शिक्षा सुनावताच ज्यांनी हा खटला दाखल केला होता त्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी समाधान व्यक्त करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"आपली न्यायव्यवस्था आजही रामशास्त्री प्रभुणेंच्या पावलावर पाऊल टाकत चालत आहे. आजच्या निकालानंतर माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वाढला असून मी कोर्टाचे आभार मानते. कुटुंबावर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्याविरोधात एखादी सामान्य शिक्षिका जशी लढेल तशीच मी लढली आहे," असं मेधा सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोर्टाच्या या निकालानंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बांधकामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. माध्यमांसमोर केलेले वक्तव्य बदनामीकारक असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.