मुंबई - ST कर्मचाऱ्यांचा गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संप सुरू आहे. महामंडळाचे शासनात विलीन करणाच्या मागणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी राज्यभरातील आगारांमध्ये अघोषित संपावर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला आता ११२ दिवस झाले आहेत. संपावर अद्यापही तोडगा निघाला नसून आता पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. यासंदर्भात कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माहिती दिली. तसेच, राज्य सरकारवर टीका करताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांची मिमिक्रीही त्यांनी केली.
मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत काय घडलं, याची माहिती कामगारांचे अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांना दिली. यावेळी, सदावर्तेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकार न्यायालयात उघडं पडत असून माननीय मुख्य न्यायमूर्तींनी राज्य सरकारच्या वकिलांना चांगलंच सुनावल्याचंही सदावर्तेंनी म्हटले. यावेळी, संजय राऊत यांच्या 'नो क्वेशन आन्सर, नो क्वेशन आन्सर' या वाक्याची मिमिक्री करत राऊत यांच्यावरही निशाणा साधला.
संजय राऊत थोडे आऊट ऑफ फोकस झालेत की काय?. मी मुन्नाभाई एम.बी.बी.एस या पिक्चरमध्ये संजुबाबा पाहिला होता. आता राजकारणातील संजुबाबासुद्धा पाहिला आहे. या संजुबाबाला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्यास काय झाले पाहिजे, असे सदावर्ते यांनी म्हटलं आहे. सदावर्तेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या अॅड. जयश्री पाटील यांच्या कानात जाऊन नो क्वेशन आन्सर, नो क्वेशन आन्सर... असे म्हटले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियातून समोर आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत केसीआर यांच्या कानात नो कमेंट्स, नो क्वेश्न आन्सर... असे म्हणताना दिसले. राऊत यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला होता. तत्पूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतरही त्यांनी नो क्वेशन, आन्सर... असे म्हणत निघून गेले होते.
शुक्रवारी होणार पुढील सुनावणी
न्यायालयाने आता येणाऱ्या शुक्रवारी दुपारी 2.30 मिनिटांनी होणार असल्याचं सांगितलं. डंके की चोटवर आम्ही बाजू मांडू, आणि जिंकू असे मत गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं. तसेच, आमची एकच मागणी असून विलिगीकरण आणि फक्त विलगीकरण हीच आहे, असेही ते म्हणाले.