Join us

शिवसेना संसदीय पक्षनेतेपदी संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:34 PM

आतापर्यंत राऊत हे राज्यसभेतील पक्षाचे गटनेते तर अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे लोकसभेतील गटनेते होते.

मुंबई : शिवसेनेच्या संसदीय पक्षनेतेपदी राज्यसभा सदस्य संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना तसे पत्र दिले आहे.आतापर्यंत राऊत हे राज्यसभेतील पक्षाचे गटनेते तर अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे लोकसभेतील गटनेते होते. अडसूळ हेगटनेतेपदी कायम राहणार असले तरी संजय राऊत यांना दोन्ही सभागृहांचे संसदीय पक्षनेतेपद देत उद्धव ठाकरे यांनी राऊत यांचे महत्त्व वाढविले आहे.उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपा विरोधाची धार सध्या अधिक तीव्र केली आहे. संजय राऊत हेदेखील मोदी आणि भाजपाविरुद्ध कठोर भूमिका घेत आले आहेत. भाजपा-शिवसेना युतीत कटुता येण्यामागे उद्धव ठाकरे नाहीत तर संजय राऊत आहेत, असा आक्षेप भाजपाचे नेते अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेत आले आहेत. त्याच राऊत यांना नेतेपद देऊन ठाकरे यांनी मोदी विरोधाची धार आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत दिले आहेत.दोन्ही सभागृहाचे संसदीय पक्षनेतेपद पहिल्यांदाच कोण्या खासदाराला शिवसेनेने दिले आहे. शिवसेनेचे लोकसभेत १६ तर राज्यसभेत तीन खासदार आहेत. मोदी सरकारची धोरणे/निर्णय या बाबत नरमाईची भूमिका न घेता सरकारवर सडकून टीका करण्याची जबाबदारी राऊत यांच्यावर टाकण्यात आल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनासंसद