Join us  

Sanjay Raut: "शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय"; विमानतळावर संजय राऊतांसाठी शिवसैनिक एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 3:31 PM

ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजकीय सूडापोटी संजय राऊतांवर कारवाई केली जात आहे असा आरोप शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी केला आहे.

मुंबई -  शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर पहिल्यांदाच राऊत दिल्लीहून मुंबईत येत आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. संजय राऊत यांचे शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात येणार असून सांताक्रुझ ते भांडूप अशी रॅलीही काढण्यात येईल. संजय राऊत विमानतळावरून भांडुप येथील त्यांच्या निवासस्थानी जातील. गेल्या काही दिवसांपासून राऊत आणि कुटुंबावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी यावेळी भाजपावर निशाणा साधला. सुनिल राऊत म्हणाले की, शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय. गेली २ वर्ष हा योद्धा पक्षासाठी, महाविकास आघाडीसाठी भाजपाशी लढत आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजकीय सूडापोटी संजय राऊतांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आम्ही सगळे शिवसैनिक योद्धाला सलाम करण्यासाठी आलो आहोत. संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्यासोबत आहे असं त्यांनी सांगितले आहे.

संजय राऊतांची किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

भाजपा नेते किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांनी ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या रकमेचे काय झाले? ती रक्कम कुठे गेली, असे प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. किरीट सोमय्यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचेही आरटीआयमधून समोर आले आहे. याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीसांचं मला आश्चर्य वाटतं. देशद्रोही सोमय्यांची फडणवीस वकिली करत आहेत. अशा भ्रष्टाचार करणाऱ्यांना फडणवीसांनी जोडे मारले पाहिजे अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांवरही निशाणा साधला.

शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?

संजय राऊत यांचे विमानतळावर स्वागत होणार असल्याच्या बातमीवरून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला टोला लगावला.  शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर नाही. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रातील लोकांच्या पैशाचा गैरवापर केला. ते तपासात अडकले आहेत. त्यांचे स्वागत शिवसैनिक करत आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर महाराष्ट्रात असे घडले नसते. बाळासाहेबांनी भ्रष्टाचारी लोकांना उभं पण केले नसते. राऊतांवरील आरोप सिद्ध होत असल्याने संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. त्यामुळे शिवसैनिक विचार करून या गोष्टी केल्या पाहिजेत असा टोला खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला लगावला आहे.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपाकिरीट सोमय्या