Join us

"त्या यानात संजय राऊतांना पाठवाला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कटकट मिटली असती"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 5:48 PM

देशाची चंद्रयान मोहिम यशस्वी झाली असून देशभरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

मुंबई/सोलापूर - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत केंद्रातील भाजप सरकारवर सातत्याने टीका करतात. तसेच, राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर आणि नेत्यांवरही त्यांच्याकडून बोचरी टीका केली जाते. त्यातच, आता इंडिय आघाडीची बैठक मुंबईत होत असल्याने आगामी २०२४ मध्ये इंडिया आघाडीचेच सरकार येणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. देशात चंद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेचं कौतुक होत असताना राऊत यांच्याकडून झालेल्या टीकेवर आता आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

देशाची चंद्रयान मोहिम यशस्वी झाली असून देशभरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. त्यादरम्यान, संजय राऊत यांनी २०२४ ला देशात इंडिया आघाडीची सत्ता येणार असल्याचे म्हटले. ‘इंडिया’ नावाने एकत्र येत भाजपच्या नेतृत्वातील एनडीचा मुकाबला करण्याचा निर्धार करत ‘इंडिया जिंकणार, भाजप हरणार!’ असा ऐक्याचा बुलंद नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पाटणा, बंगळुरू येथील दोन बैठकांनंतर ‘इंडिया’ची महत्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. यासंदर्भात माहिती देताना संजय राऊत यांनी २०२४ रोजी केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येणार असल्याचा दावा करत, सगळ्याचा जाब द्यावा लागेल, असा इशारा दिला आहे. संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या टीकेसंदर्भात शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी मजेशीर विधान केलं.  

पंतप्रधान मोदीसाहेबांची सर्वात मोठी चूक झालीय. या यानात टाकून संजय राऊत नेला असता चंद्राकडं. तर आपल्या महाराष्ट्राची किटकीट मिटली असती, महाराष्ट्र निवांत राहिला असता, असे म्हणत आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. तसेच, संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, यासंदर्भात विचारले असता. लय आबदा होईल बिचाऱ्याची, त्यानं उभा राहू नये, एवढंच मी सांगतो, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनासोलापूरचंद्रयान-3