Join us

संजय राऊतांनी 'सव्वा रुपयांची' रक्कम वाढवावी, चंद्रकांत पाटलांनी काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:47 AM

संजय राऊत हे आपणाविरुद्ध सव्वा रुपयांचा खटला दाखल करणार असल्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, पाटील यांनी उत्तर दिलंय.

ठळक मुद्देमला जेव्हा संधी मिळेल की, सातत्याने रोज बोलणारे, रोज लिहिणारे, हॉस्पीटलमध्ये भरती झाल्यावर सुद्धा, या नावाचा जर अवॉर्ड द्यायचा आहे, तर मी तो अवॉर्ड संजय राऊत यांना देईल, असे म्हणत टोलाही लगावला. 

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील कलगीतुरा दररोज पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप आणि टीका करायची संधी दोघेही सोडत नाहीत. पत्रकार परिषदेत एकमेकांवर बोलल्याशिवाय दोन्ही नेत्यांचा सध्यातरी दिवसच संपत नाही, असे दिसून येत आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली होती. चंद्रकांत पाटलांच्याच तोंडाला फेस आल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर, आता चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं ते म्हणाले. 

संजय राऊत हे आपणाविरुद्ध सव्वा रुपयांचा खटला दाखल करणार असल्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, पाटील यांनी उत्तर दिलंय. संजय राऊत हे माझे मित्र आहेत, त्यामुळे ते जे मानहानीचा दावा दाखल करणार आहेत, तो त्यांनी वाढवावा. मानहानीचा दाव्याची रक्कम वाढवावी, कारण, त्यांचा मान फक्त सव्वा रुपयांचा नाही, त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवावी, पण ती सव्वा रुपया नक्कीच नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना चिमटा काढला आहे. तसेच, मला जेव्हा संधी मिळेल की, सातत्याने रोज बोलणारे, रोज लिहिणारे, हॉस्पीटलमध्ये भरती झाल्यावर सुद्धा, या नावाचा जर अवॉर्ड द्यायचा आहे, तर मी तो अवॉर्ड संजय राऊत यांना देईल, असे म्हणत टोलाही लगावला. 

कोथरुडलाही तोंडाला फेसच आला 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ''ईडी'शी लढताना तोंडाला फेस येईल.'' पाटील यांना 'ईडी'चा इतका अनुभव कधीपासून आला? हसन मुश्रीफ यांच्यावर माजी खासदार सोमय्या यांनी काही आरोप केले आहेत. हे आरोप चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने केले असावेत अशी मुश्रीफ यांना खात्री आहे, कारण आरोप करणाऱ्या दोघांच्याही तोंडी 'ईडी'चे नाव आहे. मुश्रीफ हे मंत्री आहेत व कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता, असेही राऊत यांनी म्हटले होते.  

विरोधकांच्या तोंडाला फेस आलाय

'ईडी' शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. 'ईडी' मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार 'केंद्रीय' जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसते, असे राऊत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाचंद्रकांत पाटील