Sanjay Raut: भाजपवाल्यांनी शिवलेले कोट २०२४ नंतर भांडीवाल्याला द्यावे लागतील; संजय राऊतांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 12:04 PM2021-11-04T12:04:30+5:302021-11-04T12:05:57+5:30
Sanjay Raut: दादरा-नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा खासदार निवडून आला. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकल्याचा आनंद शिवसेनेकडून साजरा केला जात असतानाच भाजपाकडून शिवसेनेच्या विजयावर टीका करण्यात आली.
मुंबई-
दादरा-नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा खासदार निवडून आला. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकल्याचा आनंद शिवसेनेकडून साजरा केला जात असतानाच भाजपाकडून शिवसेनेच्या विजयावर टीका करण्यात आली. महाराष्ट्राच्या बाहेर एक खासदार काय निवडून आला शिवसेनेच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडू लागली आहेत, अशी टीका भाजपाकडून केली गेली. त्यावर आता संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपवाल्यांना शिवलेले कोट २०२४ नंतर भांडीवाल्याला द्यावे लागतील, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
"भाजपाचा आज संपूर्ण देशात ठिकठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे. शिवसेनेचा खासदार आज दादरा नगर हवेतील निवडून आला याचा नक्कीच आनंद आहे. पण भाजपाला इतकं महत्त्वाचं वाटत नसेल मग केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात का उतरवली होती? रेल्वेमंत्री सहा दिवस तळ ठोकून होते. स्मृती इराणी होत्या आणि गुजरात सरकारचे मंत्रीही होते. तरीही शिवसेना सर्वांना पुरून उरली आहे. पंतप्रधानपदाच्या स्वप्नाची भाषा करणाऱ्यांनी शिवलेले कोट २०२४ साली भांडीवाल्याला देण्यासाठी तयार राहावं", असं खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे.
देशात भाजपा विरोधी वातावरण
राज्यात महाविकास आघाडीविरोधात वातावरण असल्याचं एका पत्रकारानं विचारताच राऊतांनी तुमची माहिती चुकतेय. तुम्ही नीट जाणून घ्या राज्यात आज विरोधीपक्षाच्या विरोधातच वातावरण आहे. "एक गोष्ट अत्यंत चमत्कारीक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच झालेलं नाही. राज्यात आज सरकारविरोधात नव्हे, तर विरोधी पक्षाच्याच विरोधात वातावरण आहे. हे राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळतंय", असं संजय राऊत म्हणाले.
पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त करण्यासाठी देशभर भाजपाचा पराभव करा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात १० रुपयांची कपात करुन जनतेला दिवाळी भेट दिली. पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्यामुळे भाजपा सरकारवर टीका केली जात असताना केंद्रानं इंधन दरात कपात करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी मात्र मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. देशातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळेच केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. मग ५० रुपयांनी पेट्रोल स्वस्त करायचं असेल तर आपल्याला आता संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.