Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीकडे राजकीय हेतूनं पाहू नका, अशा भेटी होत असतात या भेटीत पवारांनी फडणवीसांना राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असंच सांगितलं असेल असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ओबीसी आरक्षणाबाबतच्या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. फडणवीस आणि पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शरद पवारांसोबतची भेट सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं होतं. पण दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. याचबाबत आज संजय राऊत यांना विचारण्यात आलं.
"राज्य सरकारला विरोधकांनी सहकार्य करण्याची गरज आहे हेच पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल. त्यांच्या भेटीकडे राजकीय हेतूनं पाहू नका. मीही पवारांना भेटलो होतो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील भेटले होते. मला वाटतं विरोधी पक्षाचे राज्यात सरकार येणार नाही, असंही शरद पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल", असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.