वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाह याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याच दरम्यान ठाकरे गटांचे नेते संजय राऊत यांनी यावरून जोरदार हल्लाबोल केल आहे.
"कावेरी नाखवा यांचा जीव १० लाखांचा आहे का? या राज्यात कायदा-सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झाली आहे. रस्त्यावर चिरडून मरतेय. राज्याचे गृहमंत्री युजलेस आहेत" असं म्हणत संतप्त सवाल विचारला आहे. तसेच "मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते. तिच्या किंकाळ्या, आक्रोश कानापर्यंत पोहोचत नाही. तुमच्या पैशाची मस्ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही... शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"कावेरी नाखवा यांचा जीव १० लाखांचा आहे का?"
"जोपर्यंत आरोपी आणि त्याच्या कुटुंबाला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्या १० लाखाला किंमत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव १० लाखांचा आहे का? असं काही झालं की, मुख्यमंत्री पैसा वाटत फिरतात. त्या खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहेत का? या राज्यात कायदा-सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झालीय. रस्त्यावर चिरडून मरतेय. राज्याचे गृहमंत्री युजलेस आहेत."
"मराठी महिला चिरडून मारली जाते"
"इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधी संवेदना नाही. असाप्रकारचा गृहमंत्री राज्याला मिळालाय दुर्देव आहे. गृहमंत्री आपलं कर्तव्य पार पाडतायत की नाही. मुंबईच्या रस्त्यावर एक मराठी महिला चिरडून मारली जाते. तिच्या किंकाळ्या, आक्रोश कानापर्यंत पोहोचत नाही. तुमच्या पैशाची मस्ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही... शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या" असं म्हणत राऊत यांनी निशाणा साधला आहे.
"कोणाचा फायदा, कोणाला होणार हे बोलण्याची ही जागा नाही. शिवसेनेचे ग्रामीण भागातील आमदार आहेत, ते आज पोहोचतील. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या प्रज्ञात सातव हे तिन्ही मविआचे उमेदवार आहेत. जी रणनिती आम्ही बनवलीय, त्यानुसार तिन्ही उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील. त्यांनी आपापले आमदार संभाळावेत" असं देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.