Sanjay Raut: 'गटारात तोंड बुडवून थुंकणं याला टीका म्हणत नाहीत'; संजय राऊतांचा पुन्हा एकदा राणेंवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:34 PM2021-08-26T12:34:42+5:302021-08-26T12:35:09+5:30

Sanjay Raut: आता जे चाललंय त्याला टीका नव्हे, गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

Sanjay Raut slams narayan rane over criticism | Sanjay Raut: 'गटारात तोंड बुडवून थुंकणं याला टीका म्हणत नाहीत'; संजय राऊतांचा पुन्हा एकदा राणेंवर हल्ला

Sanjay Raut: 'गटारात तोंड बुडवून थुंकणं याला टीका म्हणत नाहीत'; संजय राऊतांचा पुन्हा एकदा राणेंवर हल्ला

Next

Sanjay Raut: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा दाखल देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणेंवर प्रतिहल्ला केला आहे. "टीकांना आम्ही घाबरत नाही. शिवसेना पक्ष टीकांचं स्वागतच करतो. टीका बाळासाहेबांवरही व्हायची. पण आता जे चाललंय त्याला टीका नव्हे, गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात", असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.  ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"टीकेला कोण विरोध करतंय? टीका करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे. पण टीका करणं आणि बेताल बरळणं यात फरक आहे. सध्या जे चाललं आहे त्याला टीका म्हणत नाही. गटारात तोंड बुडवून थुंकण्याला टीका म्हणत नाहीत. असं करणाऱ्यांनी तोंड गटारात बुडतंय हे आधी लक्षात घ्यावं", असं संजय राऊत म्हणाले. 

खात्याचं काम करा, शहाणपणा करू नका; राऊतांनी सुनावलं
संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. "तुम्हाला केंद्रीय मंत्री तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी केलं आहे. इथं महाराष्ट्रात येऊल बेताल वक्तव्य करण्यासाठी नव्हे. खात्याचं काम करा. जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आणी तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असाल तर ही शिवसेना आहे हे आधी लक्षात घ्या", असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे. 

आदेश देण्याचा अनिल परबांना अधिकार
नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी दबाव आणल्यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून राणेंनीही आपल्या पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला होता. याच मुद्द्यावरुन भाजप अनिल परबांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करत असल्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी परब यांची पाठराखण केली. 

"अनिल परब यांची कोणती क्लिप व्हायरल होतेय ते मला माहित नाही. मी काही ती ऐकलेली नाही. पण ते तिथले पालकमंत्री आहेत. माहिती घेण्याचा आणि अधिकाऱ्यांशी बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

सूडाचं राजकारण करायला आमच्या हातात ईडी, सीबीआय नाही
सूडाचं राजकारण करण्यासाठीच राणेंना अटक केली गेल्याचा आरोप भाजपाकडून होत असल्याच्या मुद्द्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "सूडाचं राजकारण काय असतं ते भाजपानं बोलूच नये. सूडानं कारवाई करायला आमच्या हातात काही ईडी आणि सीबीआय नाही. सूडानं काय कारवाया केल्या जातायत हे मला बोलायला लावू नका. भाजप कुणावरही गुन्हा दाखल करू शकतो असा महान पक्ष आहे. ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करू शकतात", असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. 

Web Title: Sanjay Raut slams narayan rane over criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.