मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाल्यानंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केले. वायकर यांच्या मेहुण्याने मतमोजणीवेळी मोबाइलचा वापर करून ओटीपीद्वारे ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप विरोधकांनी केला. अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणात वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर व निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून पुन्हा एकदा रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला" असं म्हणत निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"वनराई पोलीस स्टेशनचे पी आय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) retd. पी आय सातारकर हे वनराई पोलीस स्टेशनमध्ये चार दिवसांपासून काय डील करत होते? वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे."
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वादग्रस्तफ़ोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे ऐकले. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणांत बेवड्या आरोपीचे blood sample बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत! लॅब गृह खात्याच्या अंतर्गत येतात!" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएम अनलॉक करण्यास ओटीपीची आवश्यकता लागत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
सूर्यवंशी यांनी सांगितले की, ईव्हीएम यंत्र कशाशीही जोडले जात नाही. निवडणूक कर्मचारी गुरव यांचा तो स्वत:चा मोबाइल आहे. त्यांना तो ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. आम्हीही याचा अंतर्गत तपास करणार आहोत. नायब तहसीलदारांनी गुरव यांच्याविरोधात पोलिस तक्रार केली असून गुरव यांना निलंबित करण्यात आले आहे.