मुंबई - नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले आहे. तर, गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात शिवसेना नेत्यांवर कारवाई केली आहे. ईडीमार्फत राष्ट्रवादीच्या दोन दिग्गजांनाही अटक करण्यात आली आहे. यावरुनच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून अनेकदा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर टिका करतात. नेहरुंचा संदर्भ देत देशाच्या विकासात त्यांच्या धोरणांचा अडसर ठरल्याचेही ते सांगतात. यावरुन, मोदींना सोशल मीडियातून ट्रोलही करण्यात येते. काँग्रेस नेते आणि समर्थक मोदींच्या या टिकेला प्रत्युत्तर देत असतात. आता, गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या ईडीच्या कारवाईवरुन संजय राऊत यांनी थेट पंडित जवाहरलाल नेहरुंनाच नोटीस बजावण्याचं भाष्य केलं आहे.
'हेरॉल्ड, नेहरु व ई.डी.' या मथळ्याखाली संजय राऊत यांनी रोखठोक मत मांडलं आहे. त्यामध्ये, पंडित नेहरूंना ई.डी., सीबीआयची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल!, असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राऊत यांनी निशाणा साधला आहे.
डॉ. स्वामींची लढाई
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार दाखल केली. प्रकरण न्यायालयात गेलं. अरुण जेटली अर्थमंत्री असताना चौकशी झाली. या प्रकरणात दम नाही असे त्यांचे मत होते व संपूर्ण प्रकरण बंद केले. हे सर्व प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेतले पाहिजे. 1 एप्रिल 2008 रोजी हे वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडे होती. एजीएल कंपनीवर 90 कोटींपेक्षा जास्त कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी आणखी एका कंपनीची स्थापना करण्यात आली. त्या कंपनीचे नाव यंग इंडिया लिमिटेड. यामध्ये राहुल व सोनिया यांची भागीदारी 38-38 टक्के होती. ‘एजीएल’चे नऊ कोटी शेअर्स 10 रुपये भावाने यंग इंडियाला देण्यात आलेत. 1938 साली शेअर्सचा भाव 10 रुपये होता. त्या किमतीत हे शेअर्स विकले. डॉ. स्वामी यांनी असा आरोप केला की, कोणताही व्यवसाय नाही अशी कंपनी 50 लाखांच्या बदल्यात 2 हजार कोटींची मालक बनली. या कंपनीचे इतर संचालक मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांनाही आरोपी केले, पण मुख्य झोत सोनिया व राहुलवरच राहिला. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉण्डरिंग कोठेच झाले नाही. गुन्हेगारी व्यवहाराला पैसा वापरला असे दिसत नाही. तरीही ‘ईडी’ने येथे प्रवेश केला.
एखादे समन्स नेहरुंच्या नावानेही निघेल
‘नॅशनल हेराल्ड’संबंधात माझी राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांशी काही प्रसंगाने चर्चा झाली. मुंबईत ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्र सुरू आहे. सुजाता आनंदन त्याच्या संपादिका आहेत, पण ‘हेराल्ड’ सुरू आहे हे महाराष्ट्रातील काँग्रेस जनांना तरी माहीत आहे काय? ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. ते कशाप्रकारे चालवले जाते? व हे वृत्तपत्र लोकप्रिय का? याची माहिती मी ‘नॅशनल हेराल्ड’ चालवू पाहणाऱ्यांना दिली. ‘सामना’ बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. तसे ‘नॅशनल हेराल्ड’ पंडित नेहरूंनी सुरू केले. ती फक्त संपत्ती नाही. विचारांचे व भूमिकांचे ते वाहक आहेत. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात कर्ज फेडण्यासाठी व्यवहार झाला. त्यास गैरव्यवहार म्हणता येणार नाही. या सर्व प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. काय सांगावे, ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात एखादे समन्स नेहरूंच्या नावाने त्यांच्या स्मारकावरही चिकटवले जाईल. गांधी, नेहरू, पटेल यांच्या स्वातंत्र्यसंग्रामास आर्थिक बळ दिले म्हणून बिर्ला व बजाज यांच्या नावानेही समन्स काढले जाईल.
‘नॅशनल हेराल्ड’चे प्रकरण इतके ताणायची गरज नव्हती.
पंडित नेहरूंची ही संस्था टिकावी म्हणून काँग्रेसने काही उलाढाली केल्या असतील. अशा उलाढाली संघ परिवारातील अनेक संस्था करतात. पीएम केअर फंडापासून भाजपच्या खजिन्यात जमा होणाऱ्या शेकडो कोटींच्या रकमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेच आहे. पण नेहरुंचा हेरॉल्ड गुन्हेगार ठरला !पंडित नेहरूंना ई.डी., सीबीआयची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल!, असेही रोखठोक मत राऊत यांनी मांडले आहे.