मुंबई - सोशल मीडियावर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मार्फ केलेला असल्याचं शीतल म्हात्रे यांनी म्हटलंय. मात्र, या प्रकारामुळे खळबळ उडाली असून आज विधानसभेतही हा मुद्दा चर्चेत आला. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत एकास अटकही केली. मात्र, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ह्या व्हिडिओची सत्यता तपासूनच कारवाई करण्याची मागणी केलीय. याशिवाय, तथ्य नसल्यास संबंधितांवरच गुन्हा दाखल करण्याचीही मागणी राऊत यांनी केलीय.
मला या व्हिडिओबाबत काहीही माहिती नसून आज सकाळीच, असा काही व्हिडिओ आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आली. पण, या व्हिडिओशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी, गुन्हे लपवण्यासाठी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल तर ते कायद्याचं राज्य नाही. कोणीही व्हिडिओ काढून व्हायरलं करतं, याचा आमच्याशी संबंध नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी मांडली. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमात कोणीही अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. हा व्हिडिओ खरा की खोटा याचा तपास करा. तो व्हिडिओ खरा असेल तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करुन समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही राऊत यांनी माध्यमांशी केली.
विधानसभेतही चर्चेत आला मुद्दा
पाँईंट ऑफ रिन्फॉर्मेशनअंतर्गत शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभेत शितल म्हात्रेंच्या व्हायरल क्लीपचा मुद्दा उपस्थित केला. व्हिडिओ मॉर्फींग करुन एका प्रतिष्ठीत महिलेचा, माजी नगरसेविकेचा हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. एका महिलेनं कितीवेळा मीडियासमोर येऊन स्वत:ला सिद्ध करायचं की मी चुकीची नाहीये, अध्यक्ष महोदय या मॉर्फींगमुळं तिचं आयुष्य बरबाद होईल, ती विवाहित महिला आहे. म्हणूनच, याप्रश्न कुठली कारवाई केली जाईल, असा सवाल यामिनी जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केला. तसेच, आमदार मनिषा चौधरी यांनीही शितल म्हात्रेंची बाजू घेत याप्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी केली आहे.