Join us

“भाजपाच्या टोळ्यांना असेच उत्तर दिले पाहिजे”; संजय राऊतांनी केली अंबादास दानवेंची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 2:41 PM

Sanjay Raut News: आमच्या अंगावर कोणी येत असेल तर शिवसैनिक म्हणून आम्हाला त्यांच्यावर त्या पद्धतीने चाल करावी लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Sanjay Raut News: विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपा सदस्य प्रसाद लाड एका मुद्द्यावरून आमनेसामने आल्याचे मिळाले. तसेच अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंबादास दानवे आपल्या कृतीवर ठाम आहेत. या सर्व प्रकारावरून आता अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अंबादास दानवे यांचे समर्थन करत भाजपावर टीका केली.

विधान परिषदेत झालेल्या गोंधळावरून संजय राऊत यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भाजपाच्या टोळ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून राज्याची सूत्र गेली आहेत. तेव्हापासून त्यांनी भारतीय जनता पक्षाची झालर टाकून टोळ्या बनवल्या आहेत. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

या सर्व लोकांना हिंदुत्व काय माहिती?

या सर्व लोकांना हिंदुत्व काय माहिती? हे सर्व लोक देवेंद्र फडणवीसांनी गोळा केले आहेत. दिल्लीमध्ये आहे, तेच महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेला एकही माणूस हा खऱ्या भारतीय जनता पक्षाचा नाही. आमच्या अंगावर कोणी येत असेल तर शिवसैनिक म्हणून आम्हाला त्यांच्यावर त्या पद्धतीने चाल करावी लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. 

दरम्यान, त्यांना कायदे आणि संविधान आता आठवायला लागले आहेत. त्यांना कायद्याची जाणीव झाली हे चांगले आहे. आम्हाला नियम आणि कायदे शिकवायची गरज नाही. भाजपाने राहुल गांधींना आणि १५० खासदारांना संसदेमधून निलंबित केले होते. भाजपाने संसदीय भाषा आणि नियम, कायदे उद्धव ठाकरे यांना आणि मला शिकवण्याची गरज नाही. प्रसाद लाड हे राजकारणात नवीन आहेत. मी शिवसैनिक आहे. मला काही फरक पडत नाही. यापुढेही भूमिका अशीच राहील. तरीही ते सभागृहात होते. बाहेर असते तर प्रसाद दिला असता, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :विधान परिषदअंबादास दानवेसंजय राऊतशिवसेना