Join us  

पंतप्रधान मोदींचा दौरा अन् शिंदे-फडणवीसांचा दावोस दौरा रद्द; संजय राऊतांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 10:37 AM

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना गुंतवणुकीपेक्षा मुंबई महापालिका निवडणुकीची चिंता लागली आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.

मुंबई - दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला देशातील सर्व राज्यांचे प्रतिनिधी जाणार आहेत. परंतु राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोस दौरा रद्द केला तर मुख्यमंत्री दावोसवरून दौरा लवकर गुंडाळून राज्यात परतणार आहेत. दावोस दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं असून हे सरकार गुंतवणुकीबाबत गंभीर नाही असा आरोप त्यांनी केला आहे. 

संजय राऊत यांनी सांगितले की, पंतप्रधान काही तासांसाठी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्याची तारीख विनंती करून बदलता आली असती. मात्र शिवसेनेचा पराभव करणे आणि मुंबई महापालिका निवडणुका हेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांना विनंती केली असती तर त्यांनी तारीख पुढे ढकलली असती. देशातील सर्व राज्याचे प्रतिनिधी दावोसला चालले आहेत आणि आमचे सरकार दौरा रद्द करत आहे त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार गुंतवणुकीबाबत गंभीर नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत पंतप्रधान मुंबईत येणार म्हणून दावोस दौरा उपमुख्यमंत्र्यांनी रद्द केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना गुंतवणुकीपेक्षा मुंबई महापालिका निवडणुकीची चिंता लागली आहे. राजकारण पहिले त्यानंतर महाराष्ट्र असा कारभार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा आहे. गुंतवणूक एकदा निघून गेली तर पुन्हा येत नाही. जनतेला सगळे काही माहिती आहे असं सांगत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. 

पंतप्रधान १९ जानेवारीला मुंबईत येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या दौऱ्याची तयारी जोरदार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात विविध विकासकामांचे उद्धाटन आणि भूमिपूजन करणार आहे. त्यात मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ सह मुंबई मेट्रोच्या २ नव्या मार्गिकेचे उद्धाटन करणार आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक परिषदेत भाग घेण्यासाठी १५ जानेवारीला दावोसला जाणार होते. मुख्यमंत्री शिंदे नियोजनानुसार दावोसला जातील परंतु १८ जानेवारीला ते परत मुंबई येतील. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींचा दौरा असल्यानं दावोस दौरा रद्द केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण असल्याने त्याची तयारी सध्या सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे.  

टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदी