Join us  

'समाजवाद' हा शब्द मुख्यमंत्र्यांनी ऐकलाय का?; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 10:46 AM

भाजपाला पहिल्यांदा सत्ता देण्याचे काम कुणी केले असेल तर ते समाजवादी लोकांनी केले असं राऊतांनी सांगितले.

मुंबई – या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द माहिती आहे का विचारा. समाजवाद्याची व्याख्या विचारा. ज्या शिवसेनेत ते होते, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पाईक म्हणवून घेता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे समाजवादी नेत्यांसोबत काय संबंध होते ते विचारा. जॉर्ज फर्नांडिस, एस.एम. जोशी, मधु दंडवते, नानासाहेब गोरे असतील. या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली असेल परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी अनेकदा हे नेते आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र आले होते असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्र लढा, सीमाप्रश्न अशा अनेक प्रश्नांमध्ये समाजवादी आणि शिवसेना एकत्रित आलेत. बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव कधी ऐकलंय का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी, मधु दंडवते यांचे नाव ऐकलंय का? ज्या ठाण्यातून ते येतात तिथे सर्वात जास्त समाजवादी विचारांचे लोक काम करायचे. गोदाताई परुळेकर असो वा अन्य कुणी. ज्या आरएसएससोबत मुख्यमंत्री काम करतात त्यांच्यासारखे दुटप्पी चारित्र्याचे ते लोकं नाहीत असं त्यांनी म्हटलं.

तसेच जात आणि धर्माच्या नावावर कधी या लोकांनी देश तोडण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या भाजपाच्या पदराखाली मुख्यमंत्री बसलेत. या भाजपाला पहिल्यांदा सत्ता देण्याचे काम कुणी केले असेल तर ते समाजवादी लोकांनी केले. त्यात जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण आणि चंद्रशेखर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना समाजवाद समजून घ्या म्हणावे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा समाजवाद्यांनी कधी केली नाही. ती संघ परिवाराने केली, ज्यांच्यासोबत तुम्ही आहात. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या गंथालयात जावं, समाजवाद काय हे समजून घ्यावे असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

दरम्यान, मृणाल गोरे, अहिल्या रानडेकर, सदानंद वर्पे, भाई वैद्य हे निष्कलंक चारित्र्याचे लोक महाराष्ट्राच्या राजकारणात होते, ते समाजवादी विचारांचे होते. शिवाजीराव पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू यांच्याशी आमचे बऱ्याचदा मतभेद झाले आहेत. तरीही त्यांच्या महाराष्ट्र प्रेम आणि राष्ट्रभक्ती यांच्याबद्दल कुठलीही शंका घेता येणार नाही असंही संजय राऊतांनी बजावले आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेसंजय राऊतभाजपा