मुंबई - वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे. या निर्णयावरुन अनेकांनी सरकारला ट्रोल केलंय. मात्र, सरकारकडून या निर्णयाचे समर्थन करत फायदे सांगण्यात येत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही याबाबत रोखठोक मत मांडले आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावरच वायनरी चालत असल्याने निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. मात्र, भाजप नेत्यांनी या निर्णयावरुन सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावरुन सरकारवर टीका करताना, आम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवू देणार नाही, असे म्हटलंय. त्यानंतर, संजय राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
तुमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र होईल असे निर्णय घेतले जाणार होते पण ते आम्ही होऊ दिलं नाही. शेतकऱ्याला चार पैसे मिळणार असतील तर केंद्रानेही असे धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. जे राजकीय पक्ष याचा विरोध करत आहेत, त्यांनी याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्याचं आर्थिक गणित समजून घ्यावं, असेही राऊत यांनी म्हटले.
काय म्हणाले फडणवीस
राज्यातील जनतेला पेट्रोल डिझेलच्या दरात सवलत मिळाली नाही. पण, दारूवरील टॅक्स कमी करुन ती स्वस्त करण्यात आली. शाळा, मंदिरे बंद आहेत, पण वाईनशॉप सुरू आहेत. दारुबंदी उठविण्यात येत आहे. आता, सुपरमार्केट/किराणा दुकानात वाईन विक्री होणार आहे. मात्र, महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाहीत, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
भाजपा नेत्यांना लगावला टोला
राज्याच्या वाईन धोरणावर टीका करणाऱ्या भाजपाचाही नवाब मलिक यांनी यावेळी समाचार घेतला. "गोव्यात आणि हिमाचलमध्येही भाजपाने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपाने वाईन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र ते विरोध करत आहेत", असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.