पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:53 AM2022-11-10T11:53:01+5:302022-11-10T12:00:09+5:30
Sanjay Raut Criticize Raj Thackeray: तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी सकाळच्या वेळी माध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह राज ठाकरेंवरही निशाणा साधला.
मुंबई - जवळपास १०३ दिवसाच्या तुरुंगावासानंतर ठाकरे गटातील नेते खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय राऊत यांचे ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी सकाळच्या वेळी माध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह राज ठाकरेंवरही निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, आज तीन महिन्यांनंतर हातावर घड्याळ बांधलंय. तुरुंगात घड्याळ वापरण्यास बंदी होती. बाहेर आल्याबर लोकांनी माझं जोरदार स्वागत केलं. मला वाटलेलं लोक मला विसरतील. मात्र तसं झालं नाही. कालच्या निर्णयानंतर माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे. माझ्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई बेकायदेशीर होती. मला अटक होईल आणि एकांतात बोलण्याचा सराव करावा असं राज ठाकरे माझ्याबद्दल बोलले होते. मी त्यांना सांगू इच्छितो एकांतातला काळ मी सत्कारणी लावला. राजकारणात शत्रू तुरुंगात जावा अशी भावना असू नये. सावरकर, टिळकही एकांतात होते. सावरकरांसारखाच मी एकांतात राहिलो. एकांतामधील काळ मी सत्कारणी लावला, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
दरम्यान, तुरुंगाबाहेर आल्यानंतर अनेक नेत्यांकडून आपली विचारपूस झाल्याचेही राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज सकाळी शरद पवारांचा फोन आला होता. त्यांना माझी काळजी होती. इतर अनेकांचेही फोन आले. कालच्या निर्णयानंतर देशात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. मी कुणावरही टीका करणार नाही. कुणाबाबतही तक्रार नाही. जे भोगायचं होतं ते भोगून झालं आहे, असेही त्यांनी सांगितले.