Sanjay Raut: "लफंगा, नाव तानाजी अन् कृत्य सुर्याजी पिसाळचं", बंडखोर सावंतांवर राऊतांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 03:31 PM2022-06-26T15:31:28+5:302022-06-26T15:35:52+5:30
संजय राऊत हे सातत्याने बंडखोर आमदारांविरुद्ध कारवाई विधान करताना दिसून येत आहेत.
मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. एकीकडे शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३८ आमदार फुटले आहेत. त्यामुळे, शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरुद्ध संताप व्यक्त केला. शनिवारी शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचं पुण्यातील कार्यालयावर तोडफोड करण्यात आली. त्यानंतर तानाजी सावंत यांनी चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा केली. सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावरही दडफेक झाली. आता, शिवसेना नेते संजय राऊत यांनी तानाजी सावंत यांना सूर्याजी पिसाळ असल्याचं म्हटलंय.
संजय राऊत हे सातत्याने बंडखोर आमदारांविरुद्ध कारवाई विधान करताना दिसून येत आहेत. अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, सदा सरवणकर यांच्यानंतर आता तानाजी सावंत यांचेही नाव घेऊन त्यांनी थेट निशाणा साधला. मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राऊत यांनी भाजप नेते आणि बंडखोर आमदारांवर कठोर शब्दात टिका केली. यावेळी, भूम-परंडा वाशीतील शिवसेनेते नेते आणि मुंबईतील बांधकाम व्यावसायिक यांना उद्देशून बोलताना संजय राऊत यांनी तानाजी सावंत यांच्यावर घणाघाती टिका केली. शंकरराव बोरकर मान हलवू नका, भूम परंड्याला जा. पळून गेलाय लफंगा, नाव तानाजी आणि कृत्य सुर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपड्याचं, असे म्हणत तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला.
तानाजी सावंत यांनी दिला होता इशारा
बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला होता. "एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल" असं म्हणत इशारा दिला. सावंत यांनी "आमचे गटनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं" अशी फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे आता शिंदे गटही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
सावंत समर्थकही पुढे सरसावले
दरम्यान, शिवसैनिकांच्या विरोधानंतर बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते पुढे आले आहेत. पुण्यात ज्याठिकाणी सावंत यांच्या कार्यालयात तोडफोड केली. आज त्याठिकाणी काही कार्यकर्त्यांनी फुले वाहण्यात आली. तर दुसरीकडे बीड येथे तानाजी सावंत समर्थनार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एका शिवसैनिकाची गाडी फोडली. त्यामुळे आता दोन्ही बाजूने आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे.
गुलाबराव पाटलांना पुन्हा पान टपरीवरु बसवू
ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे श्राप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही. गुलाब पाटलांची भाषण पाहिली तर शिवसेनेत हाच असं दिसला. तुझ्या मायला ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. संदीपान भुमरे हा वॉचमेन होता, त्याला मुंबई माहिती नव्हती. हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता. आज त्याला मंत्री बनवले. शिवसेनेमुळे मी मंत्री झालो असे अश्रू उद्धव ठाकरे आणि माझ्यासमोर काढले. हे अश्रू मगरीचे होते, असे राऊत यांनी म्हटले.
किरीट सोमय्या बेरोजगार झाले - राऊत
किरीट सोमय्यांचे नवल वाटतो. तो बेरोजगार झाला. प्रताप सरनाईक दिल्लीला गेले. गेले अनेक दिवस तुरुंगात पाठवणार असं बोलत होते. अशी कुठली वॉशिंग मशीन होती हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराची केस साफ झाली. सूरतहून थेट गुवाहाटीला गेले. ही कुठल्या ब्रॅँडची वॉशिंग मशीन आहे. माझ्यावरही ईडीची कारवाई झाली. राहतं घर जप्त केले. मालमत्ता जप्त झाली परंतु मी गुडघे टेकले नाही असंही संजय राऊत म्हणाले. मला अटक करा, मला अटक करण्याचे आजही प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे गटाचे नाव सांगत नाही तर मूळ बाळासाहेब ठाकरेंचे नाव सांगतो असा इशारा संजय राऊतांनी भाजपाला दिला.