Join us

“पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही”; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 13:48 IST

Sanjay Raut News: सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजते, पुण्य कोण करत आहे, पाप कोण करत आहे, असे म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका केली.

Sanjay Raut News: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला.

आम्ही जनतेसमोर त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिद्धीविनायकाने आम्हाला आशिर्वाद द्यावेत त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे. शेवटी जनता-जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत. चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यानंतर संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ते पत्रकारांशी बोलत होते. 

पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही

ते सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आहेत, चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजते, पुण्य कोण करत आहे, पाप कोण करत आहे. चोऱ्या लबाड्या कोण करत आहे. कोण माझ्या दारात पुण्यात्म व्हायला येते आहे, हे त्यांना कळत असते. ज्या प्रकारचे पाप एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेला आहे, सिद्धिविनायक अशा प्रकारे कोणालाही आशीर्वाद देत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी सर्मपित होऊन उद्याच्या भवितव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा श्री गणेशा करत आहोत. राष्ट्रवादी पक्ष महायुतीतील पक्ष म्हणुन आगामी निवडणुकांना सामोरे जात आहे. अशा वेळेला सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. राज्य सरकारने ज्या योजनांची घोषणा केलेली आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली.  

टॅग्स :संजय राऊतअजित पवारसिद्धिविनायक गणपती मंदिर