Join us

Sanjay Raut: विझताना दिवा मोठा होतो, उत्तर सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 8:06 AM

"शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं. शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेतून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा प्रहार केला. तसेच, या हातांनी कुठलं पाप केलं नाही, तर कुठल्याही कारवाईला मी भीक घालत नाही, असे म्हणत ईडीच्या नोटीसीबद्दलचा खुलासाही राज यांनी आपल्या भाषणात केला. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. संजय राऊत हे कधी इकडे, कधी तिकडे लवंडणारे म्हणजेच लवंडे असल्याचं राज यांनी म्हटलं. राज यांच्या भाषणानंतर राऊत यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

"शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं. शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते. आज शरद पवार त्यांच्यावर खुश आहेत. त्यामुळे संजय राऊत हे कधी टांगले जातील हे कळणारही नाही," असं राज ठाकरे म्हणाले. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय, असंही त्यांनी सांगितलं. तसेच, जेवणाच्या पत्रावळी ते द्रोण असतं ना, त्यात भाजी टाकली की ते कधी इकडे, कधी तिकडे असं लवंडत असतं. त्याला आमच्या आजोबांनी मस्त नाव दिलं होतं. ते लवंडे. शिवसेनेचे संजय राऊत म्हणजे ते लवंडे. कारण, ते शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे काही समजतच नाही, अशी टीका राज यांनी केली होती. राज यांच्या टिकेवर राऊतांनी पलटवार केला आहे. 'विझताना दिवा मोठो होतो, हे आज पुन्हा दिसले...' जय महाराष्ट्र असेही ते म्हणाले.  

सुप्रिया सुळेंच्या घरी रेड नाही - राज

"गुढीपाडव्याच्या भाषणानंतर काही प्रतिक्रिया आल्या. लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीसीनं बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. एकाच घरात राहून अजित पवारांकडे रेड पडते, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही, याचं कारण मला समजेल का?," असा सवाल राज ठाकरे यांनी केला. ठाण्यात आयोजित उत्तर सभेत राज ठाकरे यांनी अनेक नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राऊतांनाही टोला लगावला.

धाडी पडूनही मोदी-पवार चांगले संबंध कसे?

"एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची रेड पडते आणि सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाहीत, याचे कारण काय. शरद पवार एकावर छापा पडला की दुसऱ्या माणसाचे नाव सांगायला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतात. पुढचा माणूस कोण हे ते त्यांना सांगत असतील. देशमुख आत गेले पवारांनी भेट घेतली, अजित पवारांच्या नातलगांवर रेड पडली पवारांनी मोदींची भेट घेतली, राऊतांवर कारवाई झाली, पवारांनी भेट घेतली. पुतण्यावर ईडी कारवाई करते, आणि मोदींशी पवारांचे चांगले संबंध कसे काय," असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामनसेराज ठाकरे