मुंबई - राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. तसेच, किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख केला. तर, शेवटी मोहित कंबोज या भाजप नेत्याच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर, मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांचे आरोप फेटाळले आहेत. तसेच, राऊत यांच्यासमवेतचा एक फोटोही शेअर केला आहे.
उद्या भाजपाचे साडेतीन नेते आत जातील असा इशारा देत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. हे साडेतीन नेते कोण असा सवाल राज्यातील लोकांना पडलेला असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटच्या क्षणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. फडणवीस यांचा एक फ्रंटमॅन आहे, मोहित कंबोज, मी त्याला ओळखत नाही. या कंबोज यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याचे पैसे जमिनी खरेदी, प्रकल्प उभारण्यासाठी वापरल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच हा कंबोज एकदिवस देवेंद्र फडणवीसांना बुडविणार असल्याचंही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या या आरोपावर मोहित कंबोजने उत्तर दिलं आहे. तसेच, राऊत यांच्यासमवेतचा फोटोही शेअर केलाय.
संजय राऊत हे मला ओळखत नाहीत असं म्हणतात. तरीही दरवर्षी गणेश उत्सवात माझ्या घरी येतात. अनेकदा मी गरज भासल्यास त्यांना पैसेही दिले आहेत, असे मोहित कंबोजने म्हटले आहे. तसेच, संजय राऊत यांचा स्वत:च्या घरात सत्कार करतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राऊत यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ईडीच्या धाडींची माहिती मुलुंडमधल्या दलालाला सर्वात आधी कशी काय मिळते, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. माझ्या मुलीच्या लग्नात असलेल्या मेहंदीवाल्याकडे ईडीवाले गेले, नेलपॉलिशवाल्याकडे गेले. मी कुठं कपडे शिवले हे विचारत माझ्या मुलुंडमधील टेलरकडेही ईडीवाले गेले होते. कितना पैसा दिया, क्या क्या दिया... अशी विचारणा केली. तुम्ही आमच्या घरात शिरताय, तुम्ही आमच्या मुलांपर्यंत जाताय, दुकानात येताय, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावेळी, एका माजी मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाचं उदाहरणही त्यांनी दिलं. भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईत मोठा सेट उभारला होता. हे मंत्रीमहोदय हे वनमंत्री होते, म्हणून हॉटेलमधील तो सेट फॉरेस्ट टाईपचा उभारला होता. या सेटमध्ये अंथरलेलं कारपेट हे 9.5 कोटी रुपयाचं होतं, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.