मुंबई - पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या चौकशीच्या अनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोरेगाव येथील गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी छापेमारी करीत काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. त्यामुळे, संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ होणार की त्यांना दिलासा मिळणार हे 4 ऑगस्ट रोजीच समजेल. मात्र, तत्पूर्वी संजय राऊत यांची जागा आता शिवसेनेच्या कोणत्या नेत्याकडे येईल, यासंदर्भात चर्चा होत आहे. शिवसेनेची भूमिका तेवढ्याच प्रभावाने आणि प्रखरतेने कोण मांडणार हेही शिवसेनेच्या मातोश्रीतील बैठकीत चर्चिले असल्याचे समजते.
शिवसेनेकडे प्रवक्त्यांची कमी नाही. अरविंद सावंत आहेत, आम्ही सर्वटीम त्यांच्यासोबत आहोत. शिवसेनेत बाजू मांडणारे, शिवसेनेची भूमिका मांडणारे टीम उद्धव ठाकरेंनी तयार केली आहे, असे म्हणत शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी अरविंद सावंत यांचं नाव घेतलं आहे. मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीत विशेषत: संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर आता पक्षाची भूमिका नेमकं कोण मांडणार, यावरही चर्चा झाली. त्यासंदर्भात भूमिका घेण्यासाठीचीही बैठकीत चर्चा झाली. त्यातूनच, दानवे यांनी अरविंद सावंत यांचं नाव घेतल्याने आता संजय राऊत यांची प्रवक्त्याची जागा अरविंद सावंत घेतील, असेच दिसून येते. सध्या राज्यात 2 सदस्यांचं सरकार असून शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या आहेत. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांना मदत आणि निधी मिळत नाही. त्यामुळे, निधी मिळण्यासंदर्भात आणि सरकारला प्रश्न विचारत शिवसेना आवाज उठवणार असल्याचं आजच्या बैठकीत ठरलं, असे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं.
दरम्यान, सध्या संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असून पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी पीएमपीएलच्या विशेष न्यायालयाने त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, या प्रकरणी अद्याप न्यायालयीन लढाई सुरू असल्याने पुढे काय होणार... हे पाहावे लागणार आहे.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण
एकूण ४७ एकर जागेवर असलेल्या पत्राचाळ पुनर्विकासाचे काम गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. या कंपनीमध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत हे संचालक होते, तर याच कंपनीमध्ये राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांचीदेखील हिस्सेदारी होती. पुनर्विकासाच्या कामातून तेथील ६७२ रहिवाशांना घरे देणे आणि तीन हजार फ्लॅटस् म्हाडाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने येथे पुनर्विकासाचे काम न करता ती जागा आणि त्यावरील चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) यांची आठ बिल्डरांना विक्री केली. या विक्रीतून या कंपनीला १,०३९ कोटी ७९ लाख रुपये मिळाले.