संजय पांडेंनंतर संजय राऊत यांना लवकरच अटक होणार?; भाजपा नेत्याचं सूचक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:16 PM2022-07-20T12:16:23+5:302022-07-20T12:17:10+5:30
Mohit Kamboj News: नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना काल रात्री ईडीने अटक केली होती. या कारवाईनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सूचक ट्विट केलं आहे.
मुंबई - नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना काल रात्री ईडीने अटक केली होती. या कारवाईनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सूचक ट्विट केलं आहे. पांडेंवर अटकेची कारवाई झाल्यानंतर आपली मोहिम फत्ते झाली असं ट्विट केलं होतं. त्यानंतर एक संजय तुरुंगात गेला, आता दुसरा लवकरच जाईल, असं ट्वीट करत मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्या अटकेबाबत इशारा दिला आहे.
गेल्या काही काळात मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच नवाब मलिक यांना अटक होईल, असा दावा केला होता. त्यानंतर काही महिन्यांतच नवाब मलिक यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. त्यानंतर मोहित कंबोज यांनी एका बड्या आयपीएस अधिकाऱ्याचं पितळ उघडं पडेल असं भाकित केलं होतं. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अडचणीत आले होते.
तर मोहित कंबोज यांच्यावरील कारवाईनंतर कंबोज यांनी १ जूनला आजची तारीख तुमची ३० तारीख आमची असेल, असं भाकित केलं होतं. त्यानंतर महिनाभरातच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचीही सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याचवेळी संजय पांडे यांना अटक झाल्यानंतर एक संजय तुरुंगात गेला, आता दुसराही जाईल, अशा आशयाचं ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
एक Sanjay गया दूसरा जल्द …….
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) July 19, 2022
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १४ जुलैला अटक केली होती. त्यानंतर आता संजय पांडे यांना अटक केल्याने खळबळ माजली होती.