Sanjay Raut on Mumbai Morcha, मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रप्रेमी आज एकवटले आहेत. आजचा महाविकास आघाडीचा हा महामोर्चा म्हणजे महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे. अशा वेळी तुम्ही त्यांना अटी कसल्या घालता? काय बोलायचं, कोणते मुद्दे बोलायचे नाहीत, हे तुम्ही आम्हाला कसं काय सांगू शकता? असं असेल तर तुम्ही आम्हाला भाषणच लिहून द्या, ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना भाषणं लिहून दिली जातात, अशा शब्दांत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
"सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी उरले असतील, तर त्यांनी आमच्यात सामील व्हा. त्यांचं महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं आहे. ज्याने संयुक्त महाराष्ट्राचे मोर्चे पाहिले असतील, तर त्यांना त्या काळाची आठवण या मोर्चामधून होईल. मुख्यमंत्री ज्या ठाण्याचे आहेत ते ठाणे आज मुद्दाम बंद केलं जातंय. मुख्यमंत्री त्यांचे शहर स्वतः बंद करत आहेत आणि त्यांचे गृहमंत्री त्यांच्या बाजूला बसून हे सगळं पाहत आहेत," अशा शब्दांत राऊतांनी परिस्थितीवर भाष्य केले.
सरकारमधील काहींच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू!
"सरकारमधील काहींच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू आहे. तो वळवळत असतो. तुम्ही सत्ताधारी आहात. विचारांना विचारांनी प्रत्युत्तर द्या. जरी तुमचं राज्य घटनाबाह्य असलं तरी तुम्ही सध्या सत्तेवर आहात. सत्तेवर असल्याचं भान ठेवा आणि प्रगल्भता दाखवा," असे खडेबोल राऊतांनी सुनावले.
"छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्यावर 'महाराष्ट्र बंद' करायला हवा होता. पण तसं काहीच दिसलं नाही. आम्ही तो बंद पुढे ढकलला आहे, पुढे पाहू. पण सध्या माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि हा बंद मागे घेऊन आमच्या मोर्चात सामील व्हावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती राजभवनात बसला आहे. यांचा मेंदू दिल्लीत गहाण ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बेताल वक्तव्य आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्रप्रेम म्हणून हे काम आम्ही हाती घेतले आहे आणि तुम्ही मिंधे आहात म्हणून तुम्ही हे सहन करत आहात. तुम्ही फक्त खोकी मोजत बसा," असा टोला राऊतांनी लगावला.
पुन्हा आमचं सरकार येईल!
भाजपाने मविआच्या महामोर्चाला प्रत्युत्तर म्हणून माफी मांगो आंदोलन करायचं ठरवलं आहे. त्यांना भविष्यात सत्ता गेल्यावर हेच करायचं आहे. आताही सांगतो की आमचं सरकार पुन्हा येईल, असा पुनरूच्चार राऊतांनी केला.