मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईत शिवसैनिकांनी राणे यांच्याविरोधात बॅनरबाजी केली. त्यामध्ये, नारायण राणे यांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत राणेंना डिवचलं होतं. आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एक फोटो शेअर करत राणेंना डिवचलं आहे.
शिवसेनेकडून लावण्यात आलेलं हे बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर, अनेकांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करताना कोंबडीचे फोटो झळकावले. मात्र, आता चक्क खासदार संजय राऊत यांनीच कोंबडीचा फोटो शेअर केला आहे. वाघाच्या जबड्यात अडकलेली तडफडणारी कोंबडी या फोटो दिसत आहे. या फोटोवर आजचा दिवस थोडक्यात.. असं लिहिलं आहे. तर, राऊत यांनीही टुडे... असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. त्यामुळे, आता राणे यांच्याकडूनही संजय राऊतांवर प्रहार केला जाण्याची शक्यता आहे.
सामनातूनही राणेंवर टीका
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून राणेंवर टीका करण्यात आली आहे. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत राणेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे. नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोक असलेला फुगा फुगवून दाखवण्याचे ठरवले आहे.
नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
शिवसैनिकांनी केलेल्या पोस्टरबाजीनंतर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरकोंबडा असा उल्लेख करणारा फोटो आपल्या ट्विटर शेअर केला. त्यामध्ये त्यांनी हा बॅनर कोण काढणार असाही सवाल केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणेदेखील आक्रमक झाल्याचे दिसून आले. नारायण राणेंनी जामीन मिळाल्यानंतर सत्यमेव जयते... असे ट्विट केले आहे.
काय म्हणाले राणे?
"मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी ऐकिव माहितीच्या आधारे बोलणार नाही. मी काय सामान्य वाटलो का? मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे," असं म्हणत नारायण राणेंनी संताप व्यक्त केला. "माझ्याविरोधात कोणी तक्रार दाखल केली, त्याचं नाव घेऊन बोला," असं राणेंनी पत्रकारांना सांगितलं. त्यावर शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी गुन्हा दाखल केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी राणेंना सांगितलं. त्यावर कोण बडगुजर? मी त्याला ओळखत नाही, असं प्रत्युत्तर राणेंनी दिलं.