मुंबई-
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत आहेत आणि नतमस्तक होत आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेले खासदार संजय राऊत यांनीही आज बाळासाहेबांसोबतच्या आठवणी जागवताना त्यांच्यासोबतचा एक खास फोटो ट्विट केला आहे.
बाळासाहेब आणि संजय राऊत एका फ्रेम असलेला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो राऊत यांनी ट्विट केला आहे. यात राऊत यांनी हे नाते खूप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है...साहेब. विनम्र अभिवादन! जय महाराष्ट्र!, असं म्हटलं आहे. तसंच आणखी एका ट्विटमध्ये राऊत यांनी बाळासाहेबांना अभिवादन करणारं पोस्टर ट्विट केलं आहे. या पोस्टरवर साहेब, प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी! असा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच बाळासाहेबांच्या दहाव्या स्मृतिदिनी अभिवादनाची भावना राऊत यांनी व्यक्त केली आहे.
शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दीदरम्यान, शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळासमोर नतमस्तक होण्यासाठी आज पहाटेपासूनच शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळी शिंदे गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीना अभिवादन केलं. त्यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी येऊन गोमूत्र शिंपडून समाधीस्थळाचं शुद्धीकरण केलं आणि बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. आज दिवसभर स्मृतिस्थळावर राज्यातील नेतेमंडळी भेट देणार आहेत.