मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची प्रखर भूमिका घेत मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दाखल देत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे, सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत हे राज ठाकरेंवर हल्लाबोल करत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरेंना हिंदू औवेसी म्हटलं होतं. त्यावरुन, मनसेचे नेते आणि संजय राऊत यांच्यात एकमेकांवर जबरी टीका होत आहे. मनसेनं आता संजय राऊत यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
राज्यात 2019 च्या विधानसभा निकालानंतर अनपेक्षित अशा महाविकास आघाडीची स्थापना झाली. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडीची स्थापन होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात आलं. त्यामुळे, सर्वाधिक 106 आमदार असेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं. संजय राऊत आणि शरद पवार यांच्या जोडीने हे सरकार अस्तित्वात आले. मात्र, यातून शिवसेनेचं नुकसान होत असल्याचं सांगितलं जात आहे. अनेकदा संजय राऊतांवर टिकाही होते, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. मात्र, काम राष्ट्रवादीसाठी करतात, अशी टिका त्यांच्यावर मनसेकडून वारंवार होते. आता, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संजय राऊत यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
राजू पाटील आणि मनचिसेचे अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत संजय राऊत हे या राज्याचे मुख्यमंत्री असताना म्हणताना उद्धव ठाकरे यांच्याऐवजी शरद पवार याचं नाव घेत आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, या राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार... असे संजय राऊत यांनी म्हटल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ 3 मे 2022 रोजीचा असल्याचे तेथील तारखेवरुन दिसून येते. दरम्यान, आमदार राजू पाटील यांना व्हिडिओ शेअर करताना, सत्य वाचा... असे कॅप्शन दिलं आहे. तसेच, खरे सुपारीबाज संजय राऊत... हेच असल्याचंही त्यांनी म्हटलंय.