Join us

संजय राऊत यांनी 'शिवतीर्थ'वर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 12:57 PM

संजय राऊत सध्या वधुपित्याच्या भूमिकेत असून मुलीच्या लग्नासाठीचे निमंत्रण देण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे29 नोव्हेंबरला मुंबईतील रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सपत्निक राजभवनावर गेले होते. 

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील नवीन बांधण्यात आलेल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शिवतिर्थावर गेले होते. त्यावेळी, राज यांनी त्याचे आपुलकीने स्वागत केले. तर, लग्नपत्रिका दिल्यानंतर राऊत गाडीत बसण्यासाठी जात असताना, राज ठाकरे गाडीपर्यंत त्यांना सोडवायला आले होते. यावेळी, राज यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. 

संजय राऊत सध्या वधुपित्याच्या भूमिकेत असून मुलीच्या लग्नासाठीचे निमंत्रण देण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी त्यांनी सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळीही, मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठीच ही कौटुंबिक भेट घेतल्याचे समोर आले होते. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेऊन त्यांनी लग्नाचे निमंत्रण दिले आहे. आता, संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेत मुलीच्या लग्नासाठीचे निमंत्रण दिले. 

संजय राऊत अनेकदा राज्यपालांसह भाजपवर टीका करतात. आपल्या प्रवक्त्याच्या भूमिकेतून भाजप नेत्यांवर हल्लाबोल करतात. मात्र, वैयक्तिक नातेसंबंध ते जपतात. त्यामुळेच, त्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपाल कोश्यारींनाही आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. राऊत यांची कन्या पूर्वशीच्या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. 29 नोव्हेंबरला मुंबईतील रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सपत्निक राजभवनावर गेले होते.  

टॅग्स :संजय राऊतमनसेराज ठाकरे