Join us

'संजय राऊतांनाच व्हायचं होतं मुख्यमंत्री, त्यांनीच युतीत कालवलं विष’; भाजपा नेते मोहित कंबोज यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 9:35 AM

Sanjay Raut & Mohit Kamboj News: शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेला दुरावा आणि मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये झालेले मतभेद या सर्वाला संजय राऊतच कारणीभूत असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी आरोप केल्यापासून भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राऊतांविरोधात आघाडी उघडली आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेला दुरावा आणि मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये झालेले मतभेद या सर्वाला संजय राऊतच कारणीभूत असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.

आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणाले की, अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची खोटी कथा संजय राऊत यांनीच रचली होती. संजय राऊत यांना स्वत:ला मुख्यमंत्री बनायचं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती तोडण्याचं काम संजय राऊत यांनीच केलं. तसेच भाजपा आणि शिवसेनेमधील दुरावा कायम राहावा यासाठी दररोज सकाळी येऊन बोलणे हे संजय राऊत यांचं राजकारण आहे.

यावेळी वाधवान प्रकरणावरूनही मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राऊत साहेब वाधवान यांना कोविड काळात कुणी पास दिला? त्यांच्यासाठी कुठल्या बंगल्यावरून फोन गेला होता. गेल्या एक वर्षापासून वाधवान कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे. कोण कोण नेते त्यांना भेटायला गेले होते. जेलमधील कैद्याला पंचतारांकित सुविधा मिळत आहेत. या सरकारमध्ये कोण मदत करत आहे. हॉस्पिटलला अय्याशीचा अड्डा कुणी बनवला आहे, असा सवालही मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारपांची मालिका सुरू आहे.  सुरुवातीला किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या या जुगलबंदीत आता इतर नेतेही सहभागी झाले आहेत.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपाराजकारण