Sanjay Raut Warning BJP : "बाप काय असतो हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल"; संजय राऊतांची भाजपा, किरीट सोमय्या यांना 'वॉर्निंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 03:10 PM2022-02-19T15:10:11+5:302022-02-19T15:13:56+5:30
लवकरच एक मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दिला इशारा
Sanjay Raut Warning BJP : कुंडल्या काढण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका. याच्या कुंडल्या, त्याच्या कुंडल्या असल्या धमक्या देणाऱ्यांना मी सांगतो की त्यांच्याही कुंडल्या आमच्याकडे आहेत. महाराष्ट्रातील सरकार मजबूत आहे त्यामुळे पोकळ धमक्या देण्यात वेळ घालवू नका. त्यात तुम्ही फसाल. आमच्यामागे ईडी, सीबीआय लावून तुम्ही आम्हाला कितीही धमक्या दिल्यात तरी रिश्ते मे हम आपके बाप लगते हैं... आणि बाप काय असतो हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपा आणि किरीट सोमय्या यांना इशारा दिला.
खासदार विनायक राऊत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही आरोपांबाबत आणि शिवसेनेवर भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांबाबत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी संजय राऊतही उपस्थित होते. त्यामुळे विनायक राऊत आणि किशोरी पेडणेकर यांनी आपापली मते मांडून झाल्यानंतर पत्रकारांनी संजय राऊत यांना काही प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी भाजपा नेत्यांना इशारा दिला.
पालघरमध्ये किरीट सोमय्याच्या कुटुंबीयांच्या नावाने प्रोजेक्ट- संजय राऊत
"किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या नावाने पालघरजवळ एक प्रोजेक्ट सुरू आहे. हे प्रोजेक्ट २६० कोटींचे असून किरीट सोमय्यांची पत्नी मेधा किरीट सोमय्या या प्रोजेक्टच्या संचालकपदी आहेत. यात इडीच्या अधिकाऱ्याचा वाटा किती? तसेच, सोमय्या परिवाराकडे हे कोटीच्या कोटी रूपयांची प्रॉपर्टी कुठून येते?" असा सवाल राऊतांनी केला. तसेच, "वसईतही किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित काही हजारो कोटींचा प्रोजेक्ट सुरू आहे. आम्ही या साऱ्यांची कागदपत्रे घेऊन ईडीच्या कार्यालयात लाखोंच्या संख्येने जाणार आहोत. त्यावेळी ईडीची कार्यालय बंद करून अधिकारी निघून जातील", असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा झाली असता राऊत म्हणाले की आजारपण हे सांगून येत नाही. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय ठणठणीत आहेत. गेले काही दिवस ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावतानाही दिसले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या चर्चा करणाऱ्यांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी करावी. त्यासोबतच, लवकरच ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचंही राऊतांनी माहिती दिली.