‘किरीट सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, अन्यथा…’ संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना रोखठोक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 11:56 AM2022-02-17T11:56:41+5:302022-02-17T11:57:16+5:30
Sanjay Raut News: संजय राऊत यांनी Kirit Somaiya यांना लक्ष्य केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाने अनेक नेते सोमय्यांना पाठिंबा देण्यासाठी समोर आले होते. त्यावरून आता संजय राऊत यांनी Chandrakant Patil यांच्यासह BJPच्या नेत्यांना रोखठोक इशारा दिला आहे.
मुंबई - भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया यामुळे सध्या शिवसेना आणि भाजपाचे नेते आमने-सामने येत आहेत. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आघाडी उघडली असून, ते सोमय्यांवर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, परवा संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना लक्ष्य केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाने अनेक नेते सोमय्यांना पाठिंबा देण्यासाठी समोर आले होते. त्यावरून आता संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या नेत्यांना रोखठोक इशारा दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, काही लोक किरीट सोमय्यांच्या बाजूने बोलताहेत. मात्र त्यांना मी सांगतो की, या प्रकरणामध्ये पडू नका. तुम्ही उघडे पडाल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वगैरे मंडळी ‘बेगानी शादीमे…’ पद्धतीने नाचताहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, या प्रकरणात पडू नका, दादा उघडे व्हाल. त्यांचं काय करायंच ते आम्ही बघून घेऊ. सोमय्यांची लोक धिंड काढणार आहेत. त्या तुम्ही सामील झालात, तर लोक तुमचेही कपडे काढलीत, असा रोखठोक इशार संजय राऊत यांनी दिला.
यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर अजून गंभीर आरोप केले. किरीट सोमय्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आतापर्यंत २११ प्रकरणं माझ्याकडे आल्या आहेत. आता दररोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आणणार आहे. किरीट सोमय्यांनी आतापर्यंत साडे सात हजार रुपये वसूल केले आहेत. किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे शेकडो कोटी रुपये उकळले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नावावर धमक्या देऊनही पैसे उकळले आहेत. हे रेकॉर्डवर आहे. काय करायचे ते करा. उखाडना है तो उखाड लो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.