मुंबई - राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसावर टीका केली. यंत्रणा आमच्याकडेही आहेत, फक्त ईडी नाही. जर ईडी ४८ तास आमच्याकडे दिली, तर भाजपासुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीच्या पराभवाचा खापर अपक्ष आमदारांवर फोडलं. त्यांनी काही आमदारांची जाहीरपणे नावेही घेतली होती. त्यानंतर, आता ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.
ईडी आमच्याकडे दिल्यास देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेला मत देतील, असेही राऊत यांनी म्हटलं होतं. राऊत यांच्या या विधानावरुन भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ''संजय राऊत दोन दिवसासाठी ईडी मागत आहेत. जसं 2 हजार उधार मागत्यात तसं. अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं,'' अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दात टिका केली आहे.
संदीप देशपांडे यांचीही टिका
संजय राऊतांच्या या विधानावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. अडीच वर्षे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असून काही करू शकला नाहीत, ४८ तास ईडी घेऊन काय करणार?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच ईडी चालवायला पण अक्कल लागते "ढ"टीमचं काम नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंना एकटे पाडण्याचा भाजपाचा डाव आहे. मुंडे कुटुंबाच आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचे नातं आहे. आणि आम्हाला पंकजा मुंडेंची काळजी असल्याचेही राऊत म्हणाले होते.