Sanjay Raut: 'पवारनिष्ठा' काय असते? पत्रकारच्या प्रश्नावर संजय राऊतांनी सांगितली निष्ठा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:24 AM2022-06-21T11:24:08+5:302022-06-21T12:09:29+5:30
केशव उपाध्ये यांनी कालच्या विधानपरिषदेच्या निकालानंतर आज ट्विट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
मुंबई- विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले असले तरी एकनाथ शिंदेंनी अचानक बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या बंडावर मोठे वक्तव्य केले आहे. यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी पवारनिष्ठा आणि बाळासाहेब निष्ठा काय असते, असा उलटप्रश्न पत्रकारांना केला.
केशव उपाध्ये यांनी कालच्या विधानपरिषदेच्या निकालानंतर आज ट्विट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, "शिवसेनेतील सध्याचा लढा हा अस्सल बाळासाहेबनिष्ठ विरुध्द पवारनिष्ठ यांच्यातला आहे. बाळासाहेबांच्या निष्ठांवतांना हिंदुत्व सोडलेले आवडले नाही, काँग्रेसला मतदान करणे पटलेलं नाही. पदासाठी राष्ट्रवादीची दमदाटी सहन करण रुचल नाही," असे उपाध्ये यांनी म्हटलं आहे. त्यावरुन, संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
''पवार निष्ठावंत हा काय प्रकार आहे? पवार निष्ठावंत वगैरे प्रकार नसतो. सगळे महाराष्ट्राचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावंत आम्ही आहोतच ना, हे आम्हाला तुम्ही शिकवू नका बाळासाहेबांची निष्ठा काय ते. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, बाळासाहेब आज असते तर त्यांनीही या सरकारला आशीर्वाद दिला असता,'' असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला.
शिवसेना आमदारांना घेराव
शिवसेनेच्या आमदारांना घेराव घातला आहे. घेराव घातल्यामुळे त्यांना परत येता येत नाही. हा घेराव फक्त गुजरातमध्येच घातला जाऊ शकतो. या आमदारांना मुख्य रस्त्यावरचे रस्ते बंद केले आहेत. महाराष्ट्राला अस्थीर करण्याची योजना गुजरातच्या भूमिवर रचली जात असून हे दुर्दैवी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, सर्वच आमदार परत येतील, कारण ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत.
एकनाथ शिंदेंसोबत 25 आमदार?; 4 मंत्रीही नॉट रिचेबल
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले असले तरी एकनाथ शिंदेंनी अचानक बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्यासोबत जवळपास 25 आमदार गुजरातच्या सुरतमध्ये असल्याचे बोलले जात आहे.