जनता थोबाड फोडेल असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना भाजपाचा टोला, दिलं असं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:47 PM2023-01-16T22:47:11+5:302023-01-16T22:48:32+5:30
Keshav Upadhye Vs Sanjay Raut: शिवराळ भाषेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले. द
मुंबई - शिवराळ भाषेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले. दरम्यान, असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल, असा टोला लगावणाऱ्या संजय राऊत यांना केशव उपाध्ये जोरदार प्रतिटोला लगावला आहे. जनतेने कुणाचं दुकान बंद केलं हे दिसतंय की, त्यातून ही चिडचिड, शिव्या येत आहेत, असं प्रत्युत्तर केशव उपाध्ये यांनी दिलं आहे.
संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शिवराळ भाषा वापरल्यानंतर केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर टीका करणारे ट्वीट केले होते. संजय राऊतजी महाराष्ट्राच राजकारण कोणत्या थराला नेत आहात? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा? असा सवाल ट्विटमधून विचारला होता. त्यानंतर केशव उपाध्ये यांना प्रत्युत्तर दिले होते.
केशवराव, हे फालतू चे धंदे बंद करा! रेटून खोटे बोलण्याची तुमची फॅक्टरी जनताच बंद केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण क्लिप दाखवा.आणि कॉमेंट करा. महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात. असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
राऊत साहेब खोट बोलण्याचा प्रश्नच नाही. आपण शब्द वापरला की नाही? आपण मुळात पत्रकार संपादक, त्यात खासदार आपल्याला राग व्यक्त करायला अशी भाषा वापरावी लागते यापेक्षा महाराष्ट्राच दुदैव काय? आणि दुकान जनतेने कुणाचं बंद केल हे दिसतय की. त्यातून ही चिडचिड, शिव्या.. https://t.co/MzpfLQBTY0
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 16, 2023
त्याला प्रत्युत्तर देताना केशव उपाध्ये म्हणाले की, राऊत साहेब खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही. आपण तो शब्द वापरला की नाही? आपण मुळात पत्रकार संपादक, त्यात खासदार आहात. आपल्याला राग व्यक्त करायला अशी भाषा वापरावी लागते, यापेक्षा महाराष्ट्राच दुदैव काय? जनतेने कुणाचं दुकान बंद केलं हे दिसतंय की, त्यातून ही चिडचिड, शिव्या येत आहेत, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.