मुंबई - विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपचे आजारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हेही मतदानासाठी विधानभवनात आले आहेत. त्यावरुन, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. मलिक-देशमुखांना (nawab malik and anil deshmukh) मतदानाची परवानगी नाही, पण रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असलेले आमदार मतदानासाठी येत आहेत, हे भेदाभेदीचेच राजकारण असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.
ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. राज्यसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठीही पुन्हा एक मोठा धक्का मानला जात आहे. त्यावरुन, संजय राऊत यांनी भाजपचे राजकारण अघोरी आणि अमानुषी असल्याचं म्हटलंय. मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही, हे भेदाभेदीचेच राजकारण. पण त्याच वेळेला लक्ष्मण जगताप (bjp mla lakshman jagatap) , मुक्ता टिळक (bjp mla mukta tilka) या दोन आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणले जाते. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात, पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जाते, असे राऊत यांनी म्हटले.
विजयाची किंवा चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? असा सवालही शिवसेनेनं विचारला आहे. तसेच, राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही थरापर्यंत घसरू शकतो. याचेच नाव चमत्कार.. असा टोलाही संजय राऊत यांनी सामनातून लगावला आहे.
जादा उमेदवार उभा करुन जिंकायचा खेळ
'राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. दुसऱ्या पसंतीच्या मतांवर तिसरी जागा जिंकण्यात भाजपला यश आले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही चमत्कार होईल, असे विरोधी पक्षनेते फडणवीस व भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. राज्यसभेची निवडणूक भाजपने सरळ मार्गाने किंवा नियमांचे पालन करून जिंकलेली नाही हे सगळेच जाणतात. अर्थात, सध्या राजकारणातील मैदानात सगळेच माफ आहे. विशेषतः कलियुगात जे मोदीयुग सुरू झाले, ते राजकारण नसून दुष्टकारण आहे. राज्यसभेची व विधान परिषदेची निवडणूक टाळता आली असती. विधान परिषदेची पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला किमान 20 मतांची गरज आहे. तरीही ‘‘आम्हीच चमत्कार करणार’’ असा धोशा या मंडळींनी लावला आहे. हातात केंद्रीय सत्ता, तपास यंत्रणा, न्यायव्यवस्थेचे दोरखंड असल्यामुळे सर्व दाबदबाव वापरुन जादा उमेदवार उभा करायचा व जिंकायचे असे खेळ सुरू आहेत' अशी टीका सेनेनं केली आहे.
मतदानाचा हक्का नाकारला, हा लोकशाहीचा खून
'अनिल देशमुख, नवाब मलिक या विधानसभा सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळू नये यासाठीही पडद्यामागून करामती केल्याच. नवाब मलिक व देशमुखांना राज्यसभेत मतदानाचा हक्क न्यायालयाने नाकारला. आता विधान परिषद निवडणुकीतही या दोन विधानसभा सदस्यांना मतदानाचा हक्क नाकारला. हे संविधानाच्या कोणत्या कलमात बसते? मलिक व देशमुख यांना बनावट पद्धतीने आरोपी केले व केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली. त्यांच्यावरील आरोप सिद्ध व्हायचे आहेत व प्रत्यक्ष खटलाही सुरू झालेला नाही. कोणत्याही न्यायालयाने त्यांना गुन्हेगार ठरवून कोणतीही शिक्षा ठोठावलेली नाही. त्यांची आमदारकी अद्याप शाबूत असताना त्यांना मतदानाचा हक्क नाकारला हा घटनेचा, लोकशाहीचा खून आहे. कलम 302 खाली हत्येचा आरोप असलेल्या, फौजदारी गुन्हा सिद्ध झालेल्या कैद्यालाही तुरुंगातून मतदानाचा अधिकार कायदा अधिनियम, 1951 प्रमाणे आहे. मलिक, देशमुख यांना पोलीस बंदोबस्तात विधान भवनात एक तासासाठी आणून मतदान करून घेता आले असते, पण देशमुख, मलिक हे विधान भवनातून भूमिगत होतील किंवा पळून जातील असे भय ‘ईडी’ला वाटले असेल. हा मूर्खपणाच आहे, अशी टीकाही सेनेनं केली.