Maharashtra Political Crisis: “आम्ही कायम उद्धव ठाकरेंसोबतच, काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही”: वर्षा राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 12:14 PM2022-08-07T12:14:21+5:302022-08-07T12:15:18+5:30
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्थानी आहेत. आम्ही कायम त्यांच्या पाठिशी आहोत, असे राऊत कुटुंबियांनी स्पष्ट केले.
मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊत यांना ईडीने अटक केली. विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना सुरुवातीला ०४ ऑगस्टपर्यंत सुनावलेली कोठडी पुन्हा वाढवली आहे. आता संजय राऊत ०८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. यातच आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही ईडीने तब्बल ८ ते १० तास कसून चौकशी केली. यानंतर, आम्ही कायम उद्धव ठाकरेंसोबत आहोत. काहीही झाले तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही, असा निर्धार वर्षा राऊत यांनी व्यक्त केला.
ईडीने वर्षा राऊत यांचा सविस्तर जबाब नोंदवल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर वर्षा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ईडीने केलेल्या चौकशीविषयी माहिती दिली. मला पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. मात्र, ईडीने पुन्हा चौकशीला बोलावलं तरी मी चौकशीसाठी पुन्हा हजर राहीन, असे वर्षा राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्टपणे सांगितले.
आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत
काहीही झाले तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही. आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत, असे वर्षा राऊत म्हणाल्या. यावर बोलताना संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत म्हणाले की, माझ्या वहिनी वर्षा राऊत यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ईडीने त्यांचा जबाब घेऊन बाहेर सोडले आहे. जबाबानंतर वहिनींशी बोललो. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जागेवर उद्धव ठाकरे आहेत. आम्ही उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या स्थानी मानतो. त्यामुळे आम्ही कधीही शिवसेना सोडणार नाही, असे सुनिल राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, पत्राचाळ पुनर्विकासातून कमावलेला बेहिशेबी नफा, यातील कोट्यवधीची रक्कम निकटवर्तीयांच्या खात्यात वळवणे, याच पैशातून संजय राऊत यांनी दादरमधील फ्लॅट घेतलाय, तसेच यातील रकमेतूनच अलिबागमध्ये अनेक जमिनी खरेदी, प्रवीण राऊतांकडून मिळालेला पैसा कसा आणि कुठे वापरला याचा शोध ईडीने घेतलाय. याशिवाय, वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्या कंपनीत अवघे काही हजार रुपयांची गुंतवणूक करून वर्षभरात लाखो लाखोंची कमाई केली आहे. ईडीची सर्वांत मोठी भक्कम बाजू म्हणजे प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिलेला जबाब असून, संजय राऊतांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.