मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १०अधिकारी पोहोचले. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु झाली होती. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा हळूहळू वाढू लागला. दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले होते. त्यानंतर साडेनऊ तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत ईडीच्या कार्यालयाकडे ४.४५ वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकासह ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. त्यानंतर ईडी कार्यालयात राऊत यांचा जबाब नोंदवला जाईल. दरम्यान संजय राऊत यांनी ट्विटरवर आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते..जो कभी हार नहीं मानता!झुकेंगे नही! जय महाराष्ट्र असे ट्वीट केले आहे.
संजय राऊत यांनी आपल्या अनोख्या शैलीत निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले. संजय राऊत यांना घरातून बाहेर पडल्यानंतर गळ्यातील भगवा गमछा काढून त्यांनी हवेत फिरवला आणि त्यांच्या समर्थकांना अभिवादन केले. तसेच दुसरीकडे खिडकीत भावुक झालेली आई आणि त्यांची पत्नी राऊत यांना ईडीचे अधिकारी घेऊन जाताना पाहताना दिसले. तसेच राऊत यांच्या घराबाहेरील रस्त्यावरून करणे ईडी कार्यालयात जाताना देखील संजय राऊत यांनी कारच्या सनरुफमधून बाहेर येऊन शिवसैनिक आणि समर्थकांना हात दाखवून आणि पुन्हा गळ्यातील भगवा गमछा फिरवून अभिवादन केले. दरम्यान आम्ही संजय राऊतांना घेऊन जाऊ देणार नाही, डोक्यावरून गाड्या गेल्या तरी चालेल असा आक्रमक पवित्रा जमलेल्या शिवसैनिकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. तसेच संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्रा चाळ घोटाळ्याबाबत कोणतेही कागदपत्रे सापडली नसल्याचे सांगितले आहे.
संजय राऊतांनी गळ्यातील गमछा काढून गरगर फिरवला अन् झाले ईडी कार्यालयाकडे रवाना