मुंबई - राजधानी मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची ११.१५ कोटींच्या मालमत्ता जप्त केली. जप्त मालमत्तांत राऊत यांच्या पत्नीच्या नावावरील दादरच्या फ्लॅटसह निकटवर्तीयांच्या रायगड व पालघरमधील मालमत्तांचा समावेश आहे. त्यामुळे, आता ईडीने जप्ती केल्यानंतर राऊत यांना दादरमधील ते घर सोडावे लागणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र, याबाबत अल्फा राजन एंड पार्टनर्स लॉ फर्मचे पार्टनर राजन गुप्त यांनी प्रकिया समजावून सांगितली. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या 2 ते 3 वर्षात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. त्यापैकी अनेक प्रकरणे ही न्यायालयात असून काही प्रकरणांवर अंतिम निर्णयही झाला आहे. मात्र, ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संबंधितास न्यायालयात दाद मागता येते. त्यानंतर, काही प्रकरणात ही संपत्ती वापस करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. ईडीने सध्या, शिवसेना नेते संजय राऊत, दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या नातेवाईकांवर कारवाई करत संपत्तीवर टाच आणली आहे. त्यामुळे, या कारवाईची प्रक्रिया आता पुढे कशी, हे माहिती करुन घेता येईल.
ईडीकडून पीएमएलए कायद्यांतर्गत एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेच्या मालमत्तेवर टाच आणली जाते. त्यानंतर, हे प्रकरण न्यायालयात जाते. मात्र, ईडीने कारवाई केल्यानंतर संबंधित व्यक्ती किंवा संस्थेस ही संपत्ती वापरता येते का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, हो ती स्थावर संपत्ती वापरात येते. व्यक्तीगत किंवा व्यवसायिकदृष्ट्या त्याचा वापर केला जाऊ शकतो. पण, या संपत्तीची खेरीदी-विक्री करता येत नाही. तसेच, इतर व्यक्तीच्या नावेही ही संपत्ती ट्रान्सफर करता येत नाही, असे राजन गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळेच, संजय राऊत हे त्यांचे दादरमधील घर वापरु शकतात.
ईडीने कुठली संपत्ती केली जप्त
प्रवीण राऊत यांच्या नावे असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीसह राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत तसेच स्वप्ना पाटकर या दोघींच्या नावावरील अलिबागमधील किहिम बीच येथील ८ प्लॉटसह वर्षा राऊत यांच्या नावावरील दादर येथील फ्लॅटवर ईडीने टाच आणली. राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या स्वप्ना पाटकर पत्नी आहेत. किहिम बीच येथील ८ प्लॉटच्या खरेदी व्यवहारात नोंदणी, इतर बाबींचे रोख व्यवहार झाले आहेत.
कारवाईला घाबरत नाही - राऊत
माझे राहते घर व स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने भाजपला उकळ्या फुटत असेल, अशा कारवाईला मी घाबरत नाही. १ रूपया जरी अवैध असेल तर ती संपत्ती भाजपला दान करेल. महाराष्ट्रात सेनेसोबत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या मला दिल्या. महाराष्ट्रातही लवकरच कारवाईचे सत्र पाहायला मिळेल. - संजय राऊत, शिवसेना नेते