मुंबई - मुंबईतील वरळीत आज शिवसेना ठाकरे गटाचा राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा पार पडला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी, सर्वच नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. तर, भाजपवरही सडकून टीका केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येथील भाषणात महाविकास आघाडीचा उल्लेख करताना मुख्यमंत्रीपदावरुन सुरू असलेल्या बॅनरबाजी आणि स्पर्धेवरही स्पष्टपणे भाष्य केलं. तसेच, उद्धव ठाकरेंचा उल्लेख विद्यमान मुख्यमंत्री असा करताना, सर्वोच्च न्यायालयाचा दाखलाही राऊत यांनी दिला.
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत जोपर्यंत आहोत, तोपर्यंत आहोत, असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवरुन एकवाक्यता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी टीकणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. त्यातच, संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीची चर्चा रंगली आहे.
सध्या भावी मुख्यमंत्र्यांचं पीक आलंय, सगळ्या पक्षाचे भावी मुख्यमंत्री झळकत आहेत, पण विद्यमान मुख्यमंत्री इथं आमच्यासमोर बसलेत. आम्ही आहोत महाविकास आघाडीत जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत, '' असं संजय राऊत यांनी शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यातील भाषणात म्हटलं. तसेच, ''महाराष्ट्रात स्वबळावर भगवा झेंडा फडकवण्याची तयारी आम्ही करतोय. स्वबळावर आम्ही १४५ आमदार निवडून आणू. मुंबई महापालिका आम्ही जिंकू,'' असा दावाही संजय राऊतांनी केला आहे. त्यावर, अजित पवार यांना प्रश्न केला असता त्यांनीही राऊतांच्या जुन्या विधानाची आठवण करुन दिली.
काय म्हणाले अजित पवार
''त्यात चुकीचं काय आहे, प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजच्या घडली तिघे एकत्र आल्याशिवाय भाजपा आणि शिंदे गटाचा मुकाबला करू शकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, आमची आघाडी २५ वर्षे टीकणार आहे. तेव्हा २५ वर्षे टीकेल असं वाटत होतं. आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय,'' असं अजित पवार यांनी म्हटलंय.