लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याआधी याप्रकरणातील अन्य आरोपी प्रवीण राऊतच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण होणार असल्याने न्यायालयाने राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली.
जामीन अर्जावरील सुनावणीत राऊत यांना न्यायालयात उपस्थित राहायला तब्बल दीड तास विलंब झाला. मात्र, हा विलंब वाहतूककोंडीमुळे झाल्याचे न्यायायाला सांगण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच न्यायालयाने राऊत यांच्या याचिकेवरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली होती.१९ सप्टेंबर रोजीच विशेष न्यायालयाने राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. त्याआधीच राऊत यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला. पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक घोटाळ्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने पत्रचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आणि या घोटाळ्याच्या कटात राऊत सहभागी असल्याचे ईडीने म्हटले आहे. जामीन अर्जाद्वारे राऊत यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.