लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत व आपल्या पतीच्या वतीने काही गुंड आपल्यावर सतत नजर ठेवून असतात व आपला मानसिक छळ करतात. याप्रकरणी तक्रार करूनही पोलीस काहीही कारवाई करत नसल्याने याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका एका ३६ वर्षीय मानसोपचार तज्ज्ञ महिलेने उच्च न्यायालयात केली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकार व महिलेच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर या याचिकेवरील निकाल राखून ठेवला.
न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने संबंधित महिलेला तिने दाखल केलेल्या अन्य एका याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. बनावट कागदपत्रे दाखल करून पीएच.डी. डिग्री घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिला जूनमध्ये अटक केली. संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर आपल्याला सूडभावनेने अटक करण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे आहे. आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी त्या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पोलिसांवर खूप राजकीय दबाव असल्याने ते आपण संजय राऊत यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवर काहीही कार्यवाही करत नाहीत. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी महिलेच्या वकील आभा सिंग यांनी न्यायालयात केली.
अन्य एका हाय प्रोफाइल प्रकरणाकडे न्यायालयाचे लक्ष वेधत सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, राजकीय दबाव खूप असल्याने पोलीस काहीही करत नाही. मनसुख हिरेनप्रमाणे उद्या या ( तक्रादार महिला) ही या जगात नसल्याची बातमी येईल. मुंबई पोलीस कसे आहेत, हे आपण पाहिले आहेत. आपल्याकडे सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा आहेत.
संबंधित महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात तीन तक्रारी दाखल केल्या आहेत. तिच्यावर पाळत ठेवण्यात येते, तिच्यावर हल्ला करण्यात आला आणि तिच्या कारचीही तोडफोड करण्यात आली. दोन तक्रारींप्रकरणी ‘ए-समरी’ रिपोर्ट दाखल करण्यात आला. याचाच अर्थ महिलेने केलेल्या आरोपांत तथ्य आहे; पण ते गुन्हेगाराला शोधू शकले नाहीत, अशी माहिती सिंग यांनी न्यायालयाला दिली.
याआधीच्या सुनावणीत न्यायालयाने मुंबई पोलिसांना महिलेने केलेल्या आरोपासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मुख्य सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी न्यायालयाला सांगितले की, एका तक्रारीबाबत अद्याप तपास सुरू आहे, तर अन्य दोन प्रकरणी ‘ए’ समरी रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे.
त्यावर राऊत यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी न्यायालयाला सांगितले की, तक्रारदार महिला राऊत यांना मुलीप्रमाणे आहे. तिच्यावर हल्ला करण्यात आला तर राऊत यांच्याच लोकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. माझ्या सांगण्यावरून हे प्रकरण वाकोला पोलिसांकडून गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आणि तिला पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली.
खोट्या पीएच.डी. डिग्री प्रकरणी आपल्याला अंतरिम जामीन देण्यात यावा व आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती महिलेच्या वतीने सिंग यांनी केली. त्यावर न्यायालयाने त्यांना याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी २६ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.