Defamation case: "विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:38 PM2024-09-26T13:38:14+5:302024-09-26T13:41:20+5:30
News about Sanjay Raut, defamation case : मुंबईतील शिवड सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवस तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय आहे?
Sanjay Raut on Defamation Case Verdict : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याचा आज (२६ सप्टेंबर) निकाल आला. शिवडी सत्र न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवत न्यायालयाने १५ दिवस तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंड ठोठावला. न्यायालयाच्या निकालावर संजय राऊतांनी त्यांची भूमिका मांडली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "ज्या देशाचे मुख्य न्यायमूर्तींच्या घरात पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला जातात, मग आमच्यासारखे जे लोक आहेत भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे त्यांना न्याय कसा मिळेल? हे अपेक्षित होतं", असे भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
"मी न्यायालयाचा आदर करतो, ज्यांनी हा निकाल दिला. मीरा भाईंदर भागात युवक प्रतिष्ठाणच्या वतीने काही काम झाले होते. त्या कामात अनियमितता झाल्या, हे मी नाही तर महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी म्हटले होते. त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यावर त्या भागाचे आमदार प्रताप सरनाईकांनी म्हटले होते की, भ्रष्टाचार झाला आहे आणि चौकशी झाली पाहिजे. त्यावर मी बोललो तर माझ्याकडून अपमान कुठे झाला?", असा सवाल संजय राऊतांनी केला.
आमच्यावर अन्याय झाला आहे - संजय राऊत
"यात भ्रष्टाचार झाला आहे. यात अनियमितता झाली आहे, असे प्रश्न मी विचारले आहेत. तसं तर हा जो व्यक्ती आहे मुलुंडचा ## पोपटलाल, तोही असे आरोप करतो. तो तर किती आरोप करतो. आम्ही न्यायालयासमोर पुरावे मांडले. पूर्ण न्याय व्यवस्थेचे संघीकर झाले आहे. पण, आम्ही न्यायालयाचा आदर करतो. आम्ही आता सेशन कोर्टात जाऊ. आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही जनतेला सांगू की, न्याय व्यवस्थेत आमच्यावर कसा अन्याय होत आहे", असे संजय राऊत म्हणाले.
"हा जो विषय आहे, युवक प्रतिष्ठाण नावाची संस्था आहे. त्या संस्थेला शौचालये बनवण्याची कामे मिळाली. त्या कामात भ्रष्टाचार, घोटाळा झाला, असा आरोप मी केला नाही. तो सगळ्यात मीरा भाईंदर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला. त्यांनी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. आमदार प्रताप सरनाईकांनी यासंदर्भात राज्य सरकारला पत्र लिहिले. चौकशीची मागणी केली. विधानसभेत या विषयावर प्रश्न विचारले गेले. त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश विधानसभेने पारीत केला होता", असे संजय राऊत म्हणाले.
आज मला शिक्षा ठोठावण्यात आली -संजय राऊत
"हा मुद्दा मी फक्त लोकांसमोर आणला. यात मी बदनामी कुठे केली? मग पहिली बदनामी प्रवीण पाटील यांनी केली. दुसरी बदनामी महापालिका अहवालाने केली. प्रताप सरनाईकांनी केली. राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली. त्याने बदनामी केली. पण, मी फक्त लोकहितासाठी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. १५ दिवसांची कैद, २५ हजार दंड... बऱ्याच शिक्षा आहेत", असे राऊत म्हणाले.
"मी सत्य बोलायचं थांबणार नाही. आम्ही वरच्या कोर्टात अपील करणार आहोत. हा जो पुरावा आहे, जो खालच्या कोर्टाने मान्य केलेला नाही", असे राऊत म्हणाले.
"विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं"
"या प्रकरणात घोटाळा तक्रारी आमदार, खासदार, महापालिका, विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत. पण, फासावर कुणाला लटकावलं, तर संजय राऊतांना. कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. एक वर्षापूर्वी लोकसभेच्या खटल्यात अशाच प्रकारे राहुल गांधींना फासावर लटकावलं होतं. आज संजय राऊतांना फासावर लटकवताहेत", असे संजय राऊत म्हणाले.
"जसं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं आहे की, न्याय व्यवस्था कुणाची तरी रखेल झाली आहे. असे मी नाही अण्णाभाऊ साठे शाहिरांनी म्हटले आहे. हे स्पष्ट दिसतंय. तरी आम्ही न्याय व्यवस्थेसमोर हात जोडून आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही या सत्यासाठी लढत राहू", असे संजय राऊत म्हणाले.
"मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी जनतेच्या हिताचा एक मुद्दा मांडला. तो भाजपाच्या लोकांना झोंबला. कारण सत्य आहे. झालेलं आहे. हे तुमचे नागडे पोपटलाल मुलुंडचे रोज सकाळी उठतात आणि आमच्यावर घाणेरडे आरोप करत सुटतात. ती बदनामी होत नाही. पण, आमच्याकडे कागद आहेत. त्याच्यावर आम्ही बोललो की, ती बदनामी होते", अशी टीका राऊतांनी भाजपावर केली आहे.
"शंभर टक्के विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं आहे. मी तयार आहे. सत्य बोलल्याबद्दल त्यांना मला तुरुंगात टाकायचं असेल, तर मी त्या लढाईला तयार आहे", असे राऊत म्हणाले.